वनसंरक्षक कार्यालयासमोरील उपोषण सुरूच, संबंधितावर निलंबनाची कारवाई करा

तीन सदस्यीय समितीमार्फत चौकशी सुरू

गडचिरोली : आलापल्ली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर यांच्या कार्यकाळातील कामे आणि खरेदी व्यवहारांमध्ये गडबड झाल्याचा आरोप करत याप्रकरणी कारवाई करण्यासाठी वनसंरक्षक कार्यालयासमोर मांडलेले उपोषण अजूनही सुरूच आहे. अ.भा.सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष योगाजी कुडवे यांनी याप्रकरणी गुरूवारी उपोषणस्थळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शेरेकर यांना आधी निलंबित करून नंतरच निष्पक्षपणे चौकशी करण्याची मागणी केली.

आलापल्ली वनपरिक्षेत्रात आलापल्ली, तलवाडा, झमेला व इतर उपक्षेत्रात फायर चौकीदार असताना अतिरिक्त बोगस चौकीदार दाखवून पैशाची उचल केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. कामांवरील मजूर बोगस दाखवून शासकीय निधीचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला. ज्या बोगस लोकांच्या नावाने रक्कम जमा करण्यात आली त्यांच्या बँक अकाऊंटमधील सहीची आणि व्हाऊचरची तपासणी करावी. त्यातून बोगस सह्या उघडकीस येतील, असे यावेळी सांगण्यात आले.

पत्रपरिषदेला चंद्रशेखर सिडाम, शंकर ढोलगे, रविंद्र सेलोटे, विलास भानारकर, निलकंठ संदोकर, पी.एल.खुणे, वैभव नाकाडे, राहुल झोडे आदी उपस्थित होते.

दरम्यान याप्रकरणी वनसंरक्षक एस.रमेशकुमार यांना विचारले असता, या आरोपांची तीन सदस्यीय समितीकडून चौकशी सुरू असून त्यांचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.