गडचिरोली : जवळपास दोन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात रमलेल्या रानटी हत्तींच्या कळपातील एका मादी हत्तीचा रविवारच्या पहाटे विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. कुरखेडा तालुक्यातील वाढोणा गावातील रघुनाथ नारनवरे या शेतकऱ्याने वन्यप्राण्यांपासून शेतातील पिकांचे संरक्षण करण्यासाठी तारांचे कुंपन करून त्यात वीज प्रवाह सोडला होता. पहाटे ३ च्या सुमारास त्या तारांचा स्पर्श होऊन करंट लागल्याने कळपातील एका हत्तीणीचा जागीच मृत्यू झाला.
ही बाब लक्षात येताच वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहायक वनसंरक्षक मनोज चव्हाण यांच्यासह वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तिकडे धाव घेतली. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी हत्तींमुळे शेतातील पिकांसोबत जीवित हाणी होत असल्याचे सांगत हत्तींचा बंदोबस्त करा, पीकांच्या नुकसानीसाठी भरपाई द्या आणि झालेल्या घटनेबद्दल कोणालाही जबाबदार धरून कारवाई करू नका, अशी मागणी केली. त्यानंतर त्यांची समजूत काढत वनविभाग, पोलिस विभागाच्या चमुने त्यांना शांत केले.
जागेवरच शवविच्छेदन आणि दफन
ताडोबा येथून बोलविलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळीच त्या हत्तीणीचे शवविच्छेदन केले. ज्या ठिकाणी ही घटना घडली ती वनविभागाचीच जागा होती. त्यामुळे त्या जागेवर १० फूट खोल खड्डा करून त्यात हत्तीणीचे दफन करण्यात आले. संध्याकाळपर्यंत ही कार्यवाही सुरू होती, अशी माहिती वनसंरक्षक एस.रमेशकुमार यांनी दिली.
शेतकऱ्यावर दाखल होणार गुन्हा
दरम्यान ज्या शेतकऱ्यांने शेताभोवती तारा टाकून त्यात करंट सोडला होता त्या रघुनाथ नारनवरे यांना वनविभागाने ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी झालेल्या घटनेची कबुलीही दिल्याचे समजते. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. विशेष म्हणजे तारांमध्ये सोडलेला वीज प्रवाह अनधिकृतपणे घेतलेला होता. त्यामुळे नारनवरे यांच्यावर वनगुन्ह्यासोबत महावितरण कंपनीकडूनही गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.