विद्यापीठाच्या राज्यस्तरीय आव्हान शिबिराच्या रॅलीत अवतरला महाराष्ट्र

देखाव्यात प्रत्येक जिल्ह्याच्या संस्कृतीचे दर्शन

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या आयोजनात येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय 10 दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर ‘आव्हान’मध्ये रविवारचा दिवस खास ठरला. वर्षाच्या अखेरच्या दिवसाच्या निमित्ताने गडचिरोली शहराच्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या रॅलीत राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य दाखविणारे देखावे, वेशभुषा करून विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र गडचिरोलीत अवतरल्याचा आभास होत होता.

शिबिराच्या सातव्या दिवशी सकाळी ही महारॅली सुमानंद सभागृहापासून सुरू झाली. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे यांनी मशाल पेटवून, तसेच रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. याप्रसंगी मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.चंद्रमौली, गोडवाना विद्यापीठाचे रासेयो संचालक तसेच आव्हान २०२३ चे समन्वयक डॉ.श्याम खंडारे, सहसमन्वक डॉ.प्रिया गेडाम, एनडीआरएफचे निरीक्षक पंकज चौधरी नागपूर, विद्यापीठाचे परीक्षक सतीश चाफले, जळगाव विद्यापीठाचे परीक्षक सचिन नाद्रे, नागपूर विद्यापीठाचे रासेयो संचालक सोपानदेव पिसे, गडचिरोली जिल्हा रासेयो समन्वयक डॉ.श्रीराम गहाणे, चंद्रपूर जिल्हा समन्वयक विजया गेडाम, विभागीय समन्वयक उषा खंडाळे, डॉ पवन नाईक, डॉ.गुरुदास बल्की, प्रदीप चाफले आदी यावेळी उपस्थित होते.

धार्मिक सलोखा, एकात्मता, भारतीय संविधान, वारकरी संप्रदाय, विज्ञान तंत्रज्ञानामुळे झालेली प्रगती, पर्यावरण, मतदान जागृती अशा अनेक सामाजिक विषयांची मांडणी करणारे नृत्य, पोस्टर्स आणि सजीव देखावे या रॅलीतून विविध विद्यापीठातून आलेल्या विद्यार्थ्यांनी सादर केले. संपूर्ण मुख्य मार्गाने फिरून पुन्हा सभागृहात पोहोचपर्यंत सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह थोडाही कमी झालेला नव्हता.

महाराष्ट्रातील २२ विद्यापीठांमधील १००० विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले होते. यामध्ये ३७ पुरुष संघ व्यवस्थापक आणि ३७ महिला संघ व्यवस्थापक यांचाही समावेश होता.