गडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण टोकावर असलेल्या अहेरी विधानसभा क्षेत्रात आरोग्यसेवेचे तीनतेरा वाजले असल्याची नेहमीच ओरड असते. यावर तोडगा काढण्यासाठी या क्षेत्राचे आमदार तथा अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू केले होते. अखेर त्याला यश आले. मुंबई येथे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. त्यात अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयासाठी १०० खाटांना मंजुरी देण्यात आली. त्यासाठी शासनाने निधीही मंजूर केला आहे. त्यामुळे अहेरी परिसरातील एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा व अहेरी येथील महिला व बालकांच्या आरोग्य सुविधांमध्ये वाढ होणार आहे.
अहेरी परिसरातील नागरिकांना आरोग्यविषयक अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. वेळेवर रुग्णांना ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नव्हत्या. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठी कसरत करून रुग्णांना उपचारासाठी दाखल करावे लागत होते. ही अडचण लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी १७ रुग्णवाहिका (108) उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. त्याला यश आले असून अहेरी परिसरासाठी १७ रुग्णवाहिका सुद्धा मंजूर करण्यात आल्या आहेत.
अहेरी विधानसभा क्षेत्र अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाते. अनेक गावांपर्यंत आरोग्याच्या सुविधा पोहोचलेल्या नाहीत. शासनाने दुर्गम भागातील काही गावांमध्ये प्राथमिक आरोग्य युनिट सुरु केले होते. त्यातून स्थानिक नागरिकांना समाधानकारक आरोग्य सुविधा मिळत नसल्याची ओरड होती. ही समस्या सोडविण्यासाठी ना.आत्राम यांनी एटापल्ली तालुक्यातील जारावंडी व जवेली (बु) येथे सुरु असलेल्या प्राथमिक आरोग्य युनिटला प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा मिळवून दिला आहे. तसेच भामरागड तालुक्यातील ताडगाव प्राथमिक आरोग्य युनिटचीही दर्जोन्नती करून आरोग्य केंद्रात परिवर्तीत केले आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांना आरोग्यविषयक मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.