गडचिरोली : राज्यातील सत्तारूढ महायुती सरकारमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) या प्रमुख पक्षांसह सर्व १२ मित्रपक्षांचा पहिलाच महामेळावा रविवार दि.१४ जानेवारीला गडचिरोलीत होत आहे. आमच्यात कोणतेही मतभेद किंवा मनभेद नाही असे दाखवत ‘तीळ गुळ घ्या, अन् गोड गोड बोला’ असा जणू संदेशच तीळ संक्रांतीच्या निमित्ताने आयोजित या मेळाव्यातून दिला जाणार आहे.
खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली तीनही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली. २०२४ च्या महाविजयाचा संकल्प करत प्रदेश नेतृत्वाच्या सूचनेनुसार हा महामेळावा रविवारी दुपारी १२ वाजता धानोरा मार्गावरील महाराजा सभागृहात होणार आहे.
या पत्रकार परिषदेला आ.डॉ.देवराव होळी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, भाजपचे लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, शिवसेना संपर्क प्रमुख हेमंत जंम्बेवार, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, पिरिपा (कवाडे)चे मुनिश्वर बोरकर, रिपाइं (आठवले)चे घुटके, भाजप किसान मोर्चाचे रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगीता पिपरे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गिता हिंगे, शिवसेनेच्या अमिता मडावी, निता वडेट्टीवार उपस्थित होते.