चळवळ सोडून शेतकरी झालेल्या आत्मसमर्पित नक्षलवाद्याची हत्या

पोलिस खबरी झाल्याचा होता संशय

गडचिरोली : 10 वर्ष नक्षल चळवळीत राहून भ्रमनिरास झाल्यानंतर पोलिसांपुढे आत्मसमर्पण करून शेतकरी होणे एका पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्याच्या जीवावर बेतले. आत्मसमर्पणानंतर सात वर्षांनी नक्षलवाद्यांनी त्याची निर्घृण हत्या केली. जग्गु ऊर्फ जयराम कोमटी गावडे असे मृताचे नाव आहे. ही घटना भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथे घडली.

जग्गू ऊर्फ जयराम गावडे आणि त्याची पत्नी रासो ऊर्फ देवे झुरु पुंगाटी हे दोघे 2007 पासून भामरागड दलममध्ये सदस्य म्हणून काम करीत होते. नक्षलवाद्यांच्या तकलादु आणि खोट्या क्रांतीची कल्पना आल्याने दोघांनीही एकत्रितपणे 7 जुलै 2017 रोजी गडचिरोली पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले होते. हिंसेचा मार्ग सोडून शांततेने जीवन जगण्यासाठी त्यांनी आत्मसमर्पणानंतर गावाकडे राहून शेती करणे पसंत केले होते.

दरम्यान दि.25 च्या मध्यरात्री जग्गूला नक्षलवाद्यांनी गाठून 26 जुलैच्या पहाटे त्याची हत्या केली आणि मृतदेह आरेवाडा ते हिद्दुर मार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ टाकला. या हत्येप्रकरणी भामरागड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भामरागड परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे.