गडचिरोली : राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी अशा मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील महिलांसोबत उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभासी पद्धतीने व्हिडीओ संवाद साधला. चंद्रपूर मार्गावरील अभिनव लॅानमध्ये झालेल्या या कार्यक्रमात माजी मंत्री तथा विधान परिषद सदस्य डॅा.परिणय फुके आणि माजी खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (एसटी मोर्चा) अशोक नेते यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेल्या लाभार्थी लाडक्या बहिणींशी देवेंद्र फडणवीस यांनी आभासी पद्धतीने संवाद साधला. तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले का? असा प्रश्न त्यांनी केल्यानंतर सर्व महिलांनी एका सुरात होकार सांगितला. यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील दोन महिला भगिनींनी उपमुख्यमंत्र्यांकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. एक महिला म्हणाली, काँग्रेसवाल्यांनी आमच्या गावातल्या बायांना खटाखट साडेआठ हजार मिळणार म्हणून सांगितलं होतं. पण तुम्ही जे सांगितलं होतं ते करुन दाखवलं. आज माझ्यासारख्या गरीब बहिणीच्या खात्यात पैसे जमा होत आहेत याचा आनंद आहे, असे म्हणत फडणवीसांना धन्यवाद दिले. दुसरी महिला म्हणाली, माझे पती गेल्यानंतर मी एकटीच संसाराचा रहाटगाडा चालवत आहे. यात तुम्ही दिलेली 1500 रुपयांची ओवाळणी मला माझ्या माहेरचा आधार वाटतो. घर चालविण्यासाठी छोटेमोठे खर्च, जीवनावश्यक वस्तूंसाठी हे पैसे कामात येईल, असा विश्वास त्या महिलेने व्यक्त केला. देवाभाऊ हा लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ ठरला आहे, असेही ती महिला म्हणाली.
याप्रसंगी माजी खासदार अशोक नेते यांनी या योजनेवरून विरोधकांचा समाचार घेतला. योजनेचा लाभ मिळणार नाही, असे म्हणत त्यांनी अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला. पण आता महिलांच्या खात्यात पैसे जमा होत असल्याने त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे महिलांच्या लक्षात येत आहे. मीसुद्धा गडचिरोली व चामोर्शी येथे या योजनेचा सर्वप्रथम प्रसार व प्रचार केला. दोन्ही ठिकाणी कार्यालय खोलून महिला भगिनींचे फॅार्म भरून घेण्यासाठी माझ्या कार्यालयातील वॅार रूमची टीम कामाला लावली. आज त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा आनंद त्या भगिनींसोबत मलाही आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्ह्यातील अनेक महिला भगिनींनी अशोक नेते यांना राखी बांधली. या महिला भगिनींच्या पाठीशी मी सदैव उभा राहीन, असा विश्वास यावेळी नेते यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने आ.कृष्णा गजबे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस रेखा डोळस, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, डॉ.चंदा कोडवते, जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी आघाडीचे जिल्हा प्रभारी डॉ.मिलींद नरोटे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, अनु.जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅड.उमेश वालदे, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, तालुकाध्यक्षा लता पुंगाटे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, जिल्हा सचिव रंजिता कोडाप, वर्षा शेडमाके, रोशनी वरघंटे, रहिमा सिद्धीकी तथा बहुसंख्येने जिल्ह्यातील महिला उपस्थित होत्या.