नक्षली नेता ताराक्कासह 11 जहाल नक्षलवाद्यांची मुख्यमंत्र्यांपुढे शरणागती

'मार्ग भरकटलेल्यांना प्रवाहात आणा'

गडचिरोली : जहाल नक्षली नेता ताराक्कासह 11 नक्षलवाद्यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे शरणागती पत्करली. यात 8 महिला आणि 3 पुरुष माओवाद्यांचा समावेश आहे. त्यात दोन दाम्पत्य आहेत. या 11 जणांवर महाराष्ट्रात 1 कोटींपेक्षा अधिकचे आणि छत्तीसगड सरकारचेही बक्षिस होते.

दंडकारण्य झोनल कमिटीची प्रमुख आणि नक्षली नेता भूपतीची पत्नी ताराक्का ही 34 वर्षांपासून नक्षली चळवळीत होती. याशिवाय 3 डिव्हिजनल कमिटी मेंबर, तर 1 उपकमांडर, 2 एरिया कमिटी मेंबर यांचा समावेश आहे. या सर्वांना पुढचे जीवन जगण्यासाठी व पुनर्वसनासाठी 86 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. मुख्यमंत्र्‍यांनी त्यांचे पुष्पगुच्छ, शाल आणि भारताचे संविधान हे पुस्तक भेट देऊन स्वागत केले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, निवडणूक आचारसंहितेच्या काळात 5 नक्षली ठार झाले. 2024 या वर्षांत 24 नक्षली ठार झाले आणि 18 माओवाद्यांना अटक करण्यात आली. गेल्या 6 महिन्यात 16 जहाल नक्षलवादी आणि आज 11 असे 27 जण मुख्य प्रवाहात आले आहेत. पोलीस दलाच्या प्रयत्नांमुळे सातत्याने माओवाद्यांचे आत्मसमर्पण सुरू आहे. मार्ग भरकटलेले आता योग्य मार्गावर येत आहेत. त्यांचे योग्य पुनर्वसन करू. त्यामुळे आता त्यांनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहून इतरांनाही योग्य मार्गावर आणावे, असे आवाहन मुख्यमंत्र्‍यांनी केले.

उत्तर गडचिरोली माओवादापासून मुक्त झाली, लवकरच दक्षिण गडचिरोली सुद्धा होईल. गेल्या 4 वर्षांत एकही युवक-युवती माओवाद्यांमध्ये सहभागी झाले नाही, ही फार मोठी उपलब्धी आहे. 11 गावांनी नक्षलवाद्यांना बंदी केली आहे. सी-60 च्या जवानांनी जनतेचा विश्वास संपादन केला. आता संविधानविरोधी चळवळीत कुणीही जायला तयार नाही, ही आनंदाची बाब आहे.

शौर्यासाठी अधिकारी-जवानांचा सत्कार

यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते पोलीस दलाला 5 बस आणि 14 चारचाकी, तसेच 30 मोटारसायकली प्रदान करण्यात आल्या. तसेच येथील पोलीस दलाच्या नुतन हेलिकॉप्टर हँगरचे उद्घाटनही करण्यात आले. नक्षल चकमकींमध्ये शौर्यपूर्ण कामगिरीसाठी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख आणि सी-60 पथकाच्या जवानांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, माजी मंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम, विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप भुजबळ पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, आ.डॉ.मिलिंद नरोटे उपस्थित होते.