राज्यासह देशाच्या औद्योगिक विकासात गडचिरोली प्रेरक ठरणार- मुख्यमंत्री

लॅायड्स मेटल्सच्या प्रकल्पांचे उद्घाटन

लॅायड्स मेटल्सच्या नामफलकाचे अनावरण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ.धर्मरावबाबा आत्राम, बी.प्रभाकरन व इतर मान्यवर.

गडचिरोली : गडचिरोली हा महाराष्ट्रातील शेवटचा नसून पहिला जिल्हा आहे. येथे होत असलेल्या औद्योगिक प्रगतीसोबतच लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या सीएसआर उपक्रमांमुळे या भागातील लोकांचे जीवनमान बदलणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह देशाच्या औद्योगिक विकासासाठी भविष्यात गडचिरोली प्रेरक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. कोनसरी येथे बुधवारी लॉयड्स मेटल्सच्या विविध प्रकल्पांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते.

याप्रसंगी अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन, ओरिसा राज्यातील पद्मश्री तुलसी मुंडा, पद्मश्री डॉ.परशुराम खुणे, गडचिरोलीचे आमदार डॉ.मिलिंद नारोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबळ, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार देवराव होळी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, राज्य उपाध्यक्ष बाबुराव कोहळे आणि महामंत्री प्रकाश गेडाम हे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, लॉयड्स मेटल्सने उभारलेले विविध प्रकल्प केवळ औद्योगिक नव्हे तर सामाजिक विकासालाही चालना देतील. स्थानिक युवकांना रोजगार, महिलांचे सशक्तीकरण, शिक्षण आणि आरोग्य सेवा यामुळे गडचिरोलीला नवी ओळख मिळेल, असे ते म्हणाले.

गडचिरोलीच्या इतिहासात प्रभाकरन यांचे नाव लिहिले जाईल

या ऐतिहासिक सोहळ्याने गडचिरोलीच्या विकासाचा पाया अधिक मजबूत केला आहे. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या या क्रांतिकारक प्रकल्पांनी जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्रात परिवर्तन घडवून आणले आहे. गडचिरोलीला औद्योगिक नकाशावर आणण्यासाठी जी हिंमत व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन यांनी दाखवली त्यामुळे त्यांचे नाव गडचिरोलीच्या इतिहासात सन्मानाने लिहिले जाईल, अशी प्रशंसा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

कामगार नाही, तुम्ही मालक झाले- प्रभाकरन

यावेळी लॅायड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. प्रकल्पात काम करणारे कर्मचारी, कामगार यांना आम्ही कंपनीचे 1000 कोटींचे शेअर्स प्रदान करीत असून त्या कर्मचाऱ्यांमध्ये काही आत्मसमर्पित नक्षलवादीही आहेत. त्यामुळे ते कामगार नसून एक प्रकारे कंपनीचे मालकच आहेत, असे प्रभाकरन म्हणाले. हे शेअर्स मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरूपात कामगारांना प्रदान करण्यात आले.

या प्रकल्पांचे झाले उद्घाटन आणि भूमिपूजन

– या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पेलेट प्लांट व भारतातील सर्वात वेगवान स्लरी पाईपलाईन प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या या 3 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे दरवर्षी 74 हजार टन कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन वाचेल. पर्यावरणपूरक वाहतुकीचे हे नवीन पाऊल गडचिरोलीतील औद्योगिक विकासासाठी क्रांतिकारक ठरेल.

– लॉयड्स मेटल्स व त्रिवेणी अर्थमुव्हर्स यांनी एकत्रितपणे भारतात सर्वप्रथम खाणकामासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या ताफ्याचे उद्घाटन केले. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे 19 टक्के इंधन वापर कमी होणार असून 79,500 टन कार्बन उत्सर्जन कमी होईल. पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाचा हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हरित उपक्रमांशी सुसंगत आहे.

– गडचिरोलीतील सर्वसमावेशक विकासासाठी लॉयड्सने विविध सीएसआर उपक्रम राबवले आहेत. सुरजागड येथे पोलिसांच्या सशस्त्र पोस्टवरील कर्मचाऱ्यांसाठी कुटुंब निवास, व्यायामशाळा व बालोद्यान उभारण्यात आले आहे. या उपक्रमामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना चांगल्या राहणीमानाची सोय उपलब्ध होणार आहे.

– हेडरी येथे लोखंड धातू ग्राइंडिंग युनिटचे उद्घाटन करण्यात आले. 2,700 कोटी रुपयांच्या या युनिटमुळे दरवर्षी 10 दशलक्ष टन लोखंडावर प्रक्रिया केली जाणार आहे. हा प्रकल्प गडचिरोलीच्या औद्योगिक नकाशावर नवा अध्याय उघडतो.

– लॉयड्स राज विद्यानिकेतन शाळेचे उद्घाटन करण्यात आले. या सीबीएसई मान्यताप्राप्त शाळेमुळे हेडरी येथील 400 विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊ शकतील. भविष्यात 10 हजार विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा निर्माण करण्याचा संस्थेचा मानस आहे.

– आरोग्याच्या दृष्टीने, लॉयड्स काली अम्मल मेमोरियल रुग्णालयाचे उद्घाटन झाले. 30 खाटांचे हे रुग्णालय आतापर्यंत 63 हजार लोकांपर्यंत पोहोचले आहे. हे रुग्णालय लवकरच 100 खाटांच्या मल्टिस्पेशालिटी सुविधेत रूपांतरित होणार आहे. या भागातील आदिवासी व गरीब लोकांसाठी मोफत आरोग्यसेवा देईल.

– महिलांच्या सक्षमीकरणासाठी, लॉयड्स वन्या वस्त्रनिर्मिती केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. येथे 200 महिलांनी 9 महिन्यांत 40 हजार कपडे तयार केले आहेत. 32 गावांतील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी या केंद्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.