गडचिरोली : नववर्षारंभानिमित्त अनधिकृतपणे दारूची वाहतूक होण्याच्या शक्यतेने गस्त करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धानोरा तालुक्यातील कारवाफा ते पेंढरी मार्गावरील पुस्तोला शिवारात दारूने भरलेले वाहन पकडले. त्यातील देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.
गस्तीदरम्यान गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पथकाने संशयित वाहन क्रमांक सीजी 19, बीके 1753 ची तपासणी केली. त्यामध्ये देशी दारूच्या 90 मिलीच्या 600 बाटल्या, रॅायल स्टॅग व्हिस्कीच्या 180 मिलीच्या 48 बाटल्या. हेवर्ड्स 5000 ब्रँडच्या बिअरच्या 500 मिली मापाच्या 24 कॅन आणि दारू वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा मिळून 2 लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात आरोपी उमेश देवराव कल्लो याच्याविरूद्ध दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक दुय्यक निरीक्षक जी.पी. गजभिये, जवान सो.म. गव्हारे, श्री.रा.सुरजुसे आदींनी केली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक एस.एल.चौधरी करीत आहे.