भूमी अभिलेख कार्यालयाच्या शिपायाचा टी-पॅाईंट चौकात चाकुने कापला गळा

महिला शिपायाच्या मुलाकडून हल्ला

गडचिरोली : येथील कॅाम्प्लेक्स परिसरातील भूमि अभिलेख कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्या दिनेश काकडे याच्यावर त्याच विभागाच्या लगतच असलेल्या वरिष्ठ कार्यालयात (उपअधीक्षक) कार्यरत महिला शिपायाच्या मुलाने चाकूने प्राणघातक हल्ला केला. हा थरार टी-पॅाईंट चौकात संध्याकाळी 4.30 वाजताच्या सुमारास घडला. गडचिरोली पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत हक्केखोर युवकाला अटक केली आहे. जखमी शिपायावर तातडीने शस्रक्रिया करून 17 टाके लावण्यात आले. तूर्त त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते.

सौरभ ताटीवार असे हल्लेखोर युवकाचे नाव आहे. त्याची आई भूमि अभिलेख विभागाच्या उपअधीक्षक कार्यालयात शिपाई आहे, तर जखमी दिनेश काकडे हा कनिष्ठ कार्यालयात शिपाई आहे. गुरूवारी 4 वाजताच्या सुमारास दिनेश नेहमीप्रमाणे टी-पॅाईंट चौकात चहा घेण्यासाठी गेला असताना सौरभ ताटीवार तिथे आला आणि त्याने आपल्याजवळ लपवून ठेवलेला धारदार चाकू काढत दिनेश काकडे यांच्या गळ्यावर चालवला. त्यामुळे काकडे यांचा गळा बराच कापला गेला. पण त्याही अवस्थेत त्यांनी जीव वाचवत आणि वाचवा-वाचवा असे ओरडत भूमी अभिलेख कार्यालयात धाव घेतली. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आरोपी सौरभ याला अडवत पोलिसांच्या ताब्यात दिले.

रक्तबंबाळ झालेल्या दिनेश यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर शस्रक्रिया करण्यात आली. कापलेला गळा शिवण्यासाठी 16 टाके लागल्याचे समजते. दरम्यान आरोपी सौरभ याच्याविरूद्ध भादंवि कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्राणघातक हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.