अल्पवयीन मुलीला वासनेची शिकार बनविणाऱ्याला २५ वर्षांचा कारावास

मानलेल्या मामानेच केला अत्याचार

गडचिरोली : गावालगतच्या तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला एकटी असल्याचे पाहून आपल्या वासनेची शिकार बनविणाऱ्या इसमाला तब्बल २५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. शिवाय एक लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला. ही शिक्षा विशेष जिल्हा व सत्र न्यायाधिश उत्तम एम.मुधोळकर यांनी शुक्रवारी दिली. विशेष म्हणजे तो इसम त्या मुलीचा मानलेला मामा होता. पण वासनेच्या धुंदीत त्या मामाने आपल्या मानलेल्या भाचीलाच शिकार बनविले.

अनिल बाजीराव मडावी (४८ वर्ष) रा.मोहली असे त्या आरोपीचे नाव आहे. धानोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या या आरोपीने २४ जानेवारी २०१८ रोजी पीडित मुलीच्या शाळेत जाऊन आईने तुला घरी बोलविले असा बहाणा करून तिला शाळेतून नेण्याचा प्रयत्न केला, पण मुलीने याबाबत शिक्षकाला विचारल्यामुळे आरोपीने तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर दुपारी शाळेला सुटी झाल्यानंतर ती घरून कपडे घेऊन धुण्यासाठी गावातलावावर एकटीच गेली. ही संधी पाहून आरोपी अनिल याने जोरात तिला आवाज देऊन बोलविले. पण तिने येण्यास नकार दिल्यानंतर अनिलने बळजबरीने तिला ओढत सांधवळीमध्ये नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

यानंतर पीडित मुलीची आजी शेतावर जात असल्याचे पाहून आरोपीने तेथून पळ काढला. यानंतर त्या मुलीने पुन्हा तलावावर जाऊन आपले कपडे घेऊन घर गाठले. यावेळी आरोपीने तिला रस्त्यात गाठून तू कोणाला काही सांगशिल तर कापून मारीन अशी धमकी दिली. घाबरलेल्या पीडितने ही घटना आईला सांगितली.

मुलीने घेऊन तिने धानोरा पोलिस स्टेशन गाठून हकीकत सांगितली. त्यानुसार आरोपी अनिल मडावी याच्याविरूद्ध भादंवि कलम ३७६, ५०६ (२), तसेच कलम ४, ६ बाल लैंगिक अत्याचार अधिनियम २०१२, कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला रात्री ९ वाजता अटक करण्यात आली.

या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायालयात करण्यात आली. वैद्यकीय पुरावा, साक्षीदारांचे बयाण, तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरून विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश उत्तम मुधोळकर यांनी २५ वर्षे सश्रम कारावास व एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पीडितेला देण्याचा आदेश पारित करण्यात आला. दंड न भरल्यास १ वर्ष ३ महीने वाढीव शिक्षेची तरतुद करण्यात आली.

यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी कामकाज पाहिले. गुन्हाचा प्रथम तपास पोउपनि हिम्मतराव सरगर, तर अंतिम तपास पोनि विजय पुराणिक यांनी केला.