चकमकीत ठार झालेल्या उपकमांडरसह दुसऱ्याही नक्षलवाद्याची ओळख पटली

छत्तीसगडच्या हद्दीत घातले कंठस्नान

गडचिरोली : गडचिरोली पोलिसांनी गुरूवारी दुपारी छत्तीसगडच्या सीमेत घुसून राबविलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान चकमक उडाली होती. यात दोन नक्षलवादी मारल्या गेले. त्यातील दुसऱ्याही नक्षलवाद्याची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. दोघांचेही मृतदेह हेलिकॅाप्टरने गडचिरोलीत आणून शवपरीक्षण करण्यात आले.

यातील दुर्गेश वट्टी हा कसनसूर दलमचा उपकमांडर असून त्याच्यावर ८ लाखांचे बक्षीस, तर दुसरा राकेश नामक नक्षलवादी छत्तीसगडच्या बस्तर येथील रहिवासी होता. त्याच्यावर २ लाखांचे बक्षीस होते. घटनास्थळावरून दोन अत्याधुनिक रायफल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. त्यातील एके-४७ ही रायफल २०१२ मध्ये गट्टा (फु) येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या आर.आर.पांडे या एसआरपीएफ जवानाची होती, ती त्यावेळी नक्षलवाद्यांनी पळविली होती असे पोलिसांनी स्पष्ट केले.

विशेष म्हणजे मृतांपैकी उपकमांडर दुर्गेश वट्टी याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. चार वर्षांपूर्वीच्या १५ पोलिस जवानांच्या मृत्यूस कारणीभूत जांभुळखेडा भूसुरूंग स्फोटाचा तो मुख्य सूत्रधार होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. दुसरा मृतक राकेश याच्यावर एक चकमक आणि एक इतर असे दोन गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान पुढील ऑपरेशन्स आणि परिसरात शोधमोहीम सुरू असल्याचेही पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.