
आरमोरी : आरमोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अरसोडाच्या जंगलात आठवडाभरापूर्वी अर्धवट जळालेल्या आणि कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या एका तरुण व्यक्तीच्या मृतदेहाचे रहस्य उलगडण्यात आरमोरी पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. दरम्यान धानोरा तालुक्यातील एका बेपत्ता व्यक्तीचा तर तो मृतदेह नाही ना, याची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी त्या कुटुंबातील व्यक्तींचे रक्त नमुने घेतले आहेत. मृतदेहाच्या डीएनएसोबत त्यांच्या डीएनएची पडताळणी केली जाणार आहे. ते जुळले तर मृतदेह कोणाचा आहे हे स्पष्ट होऊन त्या गूढ मृत्यूचे रहस्य उलगडणे सोपे होणार आहे.
तो मृतदेह पुरूषाचा आहे किंवा महिलेचा हेसुद्धा स्पष्ट झालेले नाही. मृतदेहाच्या डाव्या पायाजवळ आणि उजव्या हातात लहान बालकाच्या पंजासदृश अवयव आढळला आहे. त्यामुळे माय-लेक किंवा बाप-लेकाला मारून मृतदेहाची जंगलात विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गूढ मृत्यूचे रहस्य उलगडण्यासाठी पोलिसांनी विदर्भातील सर्व जिल्ह्यांत आणि गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये कोणत्या बेपत्ता व्यक्तींची नोंद आहे का याची तपासणी केली आहे. त्यानुसार धानोरा तालुक्यात एक व्यक्ती (पुरूष) बेपत्ती असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीच्या रक्तनात्यातील लोकांचे डीएनए तपासणीसाठी रक्तनमुने घेतले.
अंदाजे 25 वर्षाच्या वयातील असलेल्या त्या मृत व्यक्तीच्या अंगात अर्धवट जळालेला आकाशी रंगाचा टी-शर्ट, मेंदी कलरचा गमछा, लेटर पॅडचे हुक तसेच जळालेली स्मार्ट वॅाचही आढळली. त्या व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या इराद्याने मृतदेह अरसोडाच्या जंगात आणून टाकून तो पेटवून देण्यात आला असावा, पण मृतदेह अर्धवट जळालेला होता. तो मृतदेह सापडला त्यावेळी कुजलेला होता. त्यामुळे किमान 15 दिवसांपूर्वी मृतदेह त्या ठिकाणी टाकलेला होता, असा अंदाज बांधल्या जात आहे.
या आव्हानात्मक प्रकरणाचा उलगडा करण्यात आरमोरी पोलिसांना केव्हा यश येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.