सेवानिवृत्त आरोग्य कर्मचाऱ्यांसह नव्याने रुजू झालेल्यांचे स्वागत

नवनिर्मित नर्सेस संघटनेचे आयोजन

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटनेच्या वतीने सन 2024-25 या वर्षात सेवानिवृत्त झालेले आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक महिला, आरोग्य सेविका यांचा सत्कार तथा नव्याने जिल्ह्यात रुजू झालेल्या आरोग्य सेविकांच्या स्वागतपर सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला आ.डॉ.मिलिंद नरोटे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात सेवानिवृत्त आरोग्य कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यात सरळसेवा भरतीने नव्याने रुजू झालेल्या, तसेच जिल्ह्यात 10 ते 15 वर्ष आरोग्य सेवा देऊन बाहेर जिल्ह्यात स्थानांतरित झालेल्या आरोग्य सेविकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सुनील मडावी आणि इतर पाहु्ण्यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. आरोग्य सेविका म्हणजे आरोग्य सेवेचा महत्वाचा कणा आहे, असे प्रतिपादन यावेळी आ.डॉ.मिलिंद नरोटे यांनी केले. त्यांच्या समस्या लवकरच सोडविणार, असे आश्वासन त्यांनी दिले. आरोग्य सेविकांच्या जिल्हास्तरावर सोडविता येणाऱ्या प्रत्येक समस्या समजून घेऊन त्या सोडविण्याकरीता कार्यवाही करणार, तसेच प्रलंबित प्रकरणे मार्गी लावणार, असे आश्वासने यावेळी सीईओ गाडे यांनी दिले.

यावेळी डॉ.मडावी, डॉ.सचिन हेमके, डॉ.अमित साळवे, शंतनू पाटील यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक संघटनेच्या अध्यक्ष निमा आंबळकर यांनी केले. आरोग्य सेवेसाठी अतिदुर्गम क्षेत्रात काम करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्या समस्यांसह मागण्यांच्या निवेदनाचे वाचन संघटनेच्या सचिव मिनल वाळके यांनी केले.

कार्यक्रमाचे संचालन स्मीता लोणारे, हर्षा बनसोड, सारिका गेडाम, नलिनी भानारकर यांनी, तर आभार स्नेहा बनसोड यांनी मानले. कार्यक्रमासाठी संघटनेच्या पदाधिकारी सिंधू लठ्ठे, शीतल रायपुरे, दीक्षा डोंगळे, प्रणाली मेश्राम, शोभा गेडाम, विद्या उईके यांनी सहकार्य केले.