आलापल्ली : मौल्यवान सागवनासाठी प्रसिद्ध असलेल्या आलापल्ली वनविभागातील काही क्षेत्रात आता कुंपनानेच शेत खाण्याचा प्रकार सुरू झाला आहे. पेड्डीगुडम वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल करून अतिक्रमण केले जात आहे. वनविभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादानेच हा प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे.
मुलचेरा-श्रीनगर-खुदरामपल्ली मार्गावर रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर मौल्यवान झाडे कापण्यात आली आहेत. पेड्डीगुडम वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या या वनजमिनीवरील झाडांची अशा पद्धतीने कत्तल करून तिथे अतिक्रमण केले जात आहे. विशेष म्हणजे या भागात मोठ्या प्रमाणावर फर्निचरची दुकाने आहेत. त्यामुळे कापलेल्या झाडांचे लाकूड फर्निचरच्या रूपात या दुकानांमध्ये तर पोहोचत नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे.
मुख्य रस्त्यालगतच्या जंगलातील झाडांची कत्तल होत असताना हा प्रकार वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिसू नये याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. केवळ काही लोकांच्या स्वार्थासाठी मौल्यवान जंगल नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना वेळीच आवर घालावा, तसेच त्याला या प्रकाराला खतपाणी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून केली जात आहे.
विशेष म्हणजे या भागातील फर्निचर मार्टचीही वनविभागाने तपासणी करून अनधिकृत लाकडांच्या तस्करीला आळा घालावा अशी मागणी होत आहे.