शेतकऱ्यांची दिवाळी यावर्षी जोरात, धानाचे पीक चांगले, भावही वाढला

कुरखेडा तालुक्यात हेक्टरी ४० क्विंटल उतारा

गडचिरोली : यावर्षीच्या खरीप हंगामात पावसाने साथ दिल्याने जिल्ह्यात पिकांची स्थिती चांगली आहे. अनेक ठिकाणी धान कापणी सुरू झालेली आहे. शासकीय खरेदी केंद्रही लवकरच सुरू होणार आहेत. मात्र त्यापूर्वीच व्यापारी वर्गाकडून धानाला २४०० रुपयापर्यंत भाव देऊन धान खरेदीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी यावर्षी जोरात होणार असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात प्रामुख्याने धानाचे पीक घेतले जाते. सुरूवातीला पाऊस लांबल्यामुळे धान भरण्यास वेळ लागला. मात्र पाऊस पुरक प्रमाणात येऊन नुकसानकारक होईल असा बरसला नाही. त्यामुळे धानाचे पीक सर्वच भागात चांगले आहे. शासनाच्या आधारभूत किमतीनुसार धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून खरेदी केंद्रही निश्चित करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना मंजुरी दिली असल्यामुळे तिथे लवकरच धान खरेदी सुरू होईल.

दरम्यान कृषी विभागाने केलेल्या पीक कापणी प्रयोगात कुरखेडा तालुक्यात धानाला हेक्टरी ४० क्विंटलचा उतारा आला असून इतरही तालुक्यांमध्ये पीकाची स्थिती चांगली असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी सांगितले.