कोरची : गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात गांजाची लागवड करणाऱ्याविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत 21 लाखा 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नांगपूर घराच्या परसबागेतच गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला. कोटगुल पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तपणे हा छापा टाकत गांजाची 1 हजार 750 झाडे, आणि 43 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त केला.
या प्रकरणी अधारी धनसिंग कुवरढेरिया (58 वर्ष) रा.नांगपूर याला पोलिसांनी अटक केली. आरोपीविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली कोटगुलचे पोलीस अधिकारी विवेक वायकर व स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय कपिल आगलावे यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.
कुवरढेरीया याच्या घराच्या पाठीमागील सांदवाडीत अवैधरित्या अंमली पदार्थ (गांजा) ची लागवड केली आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक व पोलीस स्टेशन कोटगुल येथील पोलीस पथक मौजा नांगपूर येथे दाखल झाले. पंचासमक्ष झडती घेतली असता, सांदवाडीत अंमली पदार्थ (गांजा)ची झाडे लागवड केलेले दिसले.
शेतात लागवड केलेला एकूण 43.653 कि.ग्रॅ. वजन असलेला कॅनबिस वनस्पती अंमली पदार्थ (गांजा) प्रति किलो 50,000 रुपये प्रमाणे एकुण 21 लाख 82 हजार 650 रु.किंमतीचा मुद्येमाल मिळून आला. आरोपीविरूद्ध गुंगिकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस) 1985 अन्वये गुन्हा दाखल करुन मिळून आलेला अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. आरोपीस 1 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली असून, सदर गुन्ह्राचा पुढील तपास पोस्टे कोटगुल येथील पोउपनि.विवेक वायकर करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी (कुरखेडा) प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, तसेच पोस्टे कोटगुलच्या पथकाने पार पाडली.
































