गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारूची आयात करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढविल्या जातात. अशीच एक शक्कल लढवत चक्क मालवाहू वाहनाला वेल्डिंग करून वेगळा कप्पा बनवून त्यातून दारूच्या बॅाक्सची वाहतूक करण्याचा प्रकार मुलचेरा पोलिसांनी उघडकीस आणला.
प्राप्त माहितीनुसार सकाळी 6 वाजताच्या सुमारास एका पिकअप वाहनातून अवैधरित्या दारुची विक्री होत असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने मुलचेरा येथील अधिकारी व अंमलदारांनी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली जात असताना सदर वाहन नजरेस पडले. सदर वाहनाची तपासणी केली असता त्यातील बॉक्समध्ये देशी व विदेशी दारु सापडली.
त्यात वाहनासह एकूण 7,76,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच सदर वाहनातील आरोपी प्रशिल शंकर ढोले, तेजस हंसराज गिरी यांना ताब्यात घेण्यात आले. याशिवाय अरविंद निवेलकर रा.चंद्रपूर, ह.मु. घोट ता.चामोर्शी याचा शोध घेणे सुरु आहे. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोउपनि संदीप ठाकरे हे करीत आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह उपविभागीय पोलिस अधिकारी (अहेरी) सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मुलचेराचे प्रभारी अधिकारी सपोनि अशोक भापकर व पोलिस अंमलदारांनी पार पाडली.
जिल्ह्रात कुठेही अशा पद्धतीने होत असलेल्या अवैध दारू अथवा तत्सम अंमली पदार्थाच्या वाहतुकीबद्दल माहिती मिळताच गडचिरोली पोलिस दलाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे.