कोरची : पती-पत्नीमधील वादानंतर झोपी गेलेल्या पत्नीवर पहाटेच्या गाढ झोपेत पतीने कुऱ्हाडीने वार करून तिची निर्घृण हत्या केली. हा थरार कोरचीपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या बेतकाठी या गावात बुधवारी घडला. या घटनेनंतर खुनी इसमाला त्याच्या भावासह गावातील लोकांनी घरातच खुर्चीला बांधून ठेवले. नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अमरोतीन रोहिदास बंजार (33 वर्ष) असे मृत महिलेचे तर रोहिदास बिरसिंग बंजार (37 वर्ष) असे आरोपी पतीचे नाव आहे.
पोलिस सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, मोलमजुरी करणाऱ्या या बंजार पती-पत्नीमध्ये नेहमीच किरकोळ वाद होत होते. यातच मंगळवारी रात्री बंजार पती-पत्नी आणि त्यांची सर्वात लहान मुलगी वैशाली (8 वर्ष) घरात झोपी गेले. पण डोक्यात सैतान संचारलेल्या रोहिदासच्या मनात वेगळेच काही शिजत होते. पहाटे 3 वाजताच्या सुमारास तो खाटेवरून उठला आणि त्याने घरातील धारदार कुऱ्हाड काढून पत्नीच्या गळ्यावर जोरदार वार केला.
कुऱ्हाड घेऊन तो निघाला दारू ढोसायला
पत्नीला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून रोहिदास कुऱ्हाड हाती घेऊन बेतकाठी गावातील मुख्य बाजार चौकात फिरायला गेला. त्यानंतर गावातील दारू अड्ड्यावर जाऊन त्याने दारू प्राशन केली. यानंतर पुन्हा घरी येऊन पत्नीवर कुऱ्हाडीने वार केल्याचे सांगितले जाते. त्याच्या या सैतानी कृत्याने पत्नी अमरोतीन हिचे डोके शरीरापासून वेगळे होण्याचे तेवढे बाकी होते. तिचा मृतदेह घरातील खाटेच्या बाजूला खाली जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. जवळच झोपलेली मुलगी वैशाली जागी झाल्यानंतर हे दृष्य पाहून रडू लागली. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजारी राहणारा आरोपीचा मोठा भाऊ नोहरसिंग बिरसिंग बंजार यांनी घरात येऊन पाहिले असता तेथील दृष्य पाहून ते स्तंभित झाले. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने आरोपी भावाला पकडून घरी आणले आणि घरातील अंगणात हातपाय बांधून खुर्चीत बसवून ठेवले.
घटनेमागील नेमके कारण गुलदस्त्यात
या घटनेची माहिती गावात पसरताच लोकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. घरात बांधून ठेवलेल्या आरोपीला गावकऱ्यांनी विचारले तर मला काही समजले नाही, काही कळले नाही, माझ्या डोळ्यासमोर लाल-लाल अंधार आला आणि मी माझ्या पत्नीला मारले, असे उत्तर त्याने दिले. मात्र मारण्याचे नेमके कारण सांगितले नाही. गावातील नागरिकांनी 108 क्रमांकावरून रुग्णवाहिका बोलावुन घेतली होती. या रुग्णवाहिकेमध्येच मृत अमरोतीन आणि आरोपी रोहिदास बंजार यांना टाकून कोरचीला आणण्यात आले. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई ठाणेदार चंद्रकांत वाबळे करीत आहेत.
त्या चार मुलींचे भविष्य काळवंडले
या दुर्दैवी घटनेत आईची माया कायमची हिरावल्या गेल्याने आणि कारागृहात जाणाऱ्या वडीलांचा सहारा मिळणार नसल्याने चारही मुली पोरक्या झाल्या आहेत. या मुलींपैकी 15 वर्षाची माधुरी, 13 वर्षाची मनिषा, 11 वर्षाची कौशल्या आणि 8 वर्षाची वैशाली दुसरीत शिक्षण घेत आहेत. आई-वडील रोजमजुरी करून यांचा शिक्षणाचा खर्च भागवत होते. सोबतच घरातील संसाराचा गाडाही चालवीत होते. आई-वडीलांच्या छत्रछायेअभावी आता त्या मुलींचे भविष्य काळवंडणार तर नाही ना, अशी चिंता गावकऱ्यांमध्ये वक्त होत आहे.