‘त्या’ बर्निंग कार प्रकरणामागे व्यावसायिक स्पर्धा? चालक म्हणतो लुटमार झाली !

तंबाखूच्या धंद्यातील स्पर्धेतून जाळली कार

कोरची : नवरगाव-कोरची या राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी छत्तीसगडमधुन मजा हा प्रतिबंधित सुगंधी तंबाखू विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या अर्टिगा कारला अपघात झाला होता. मार्गावरील किलोमीटरदर्शक दगडाला धडक बसून त्या कारने (क्रमांक MH 35, AG7001) पेट घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. पण प्रत्यक्षात कहाणी वेगळीच असून सुगंधी तंबाखूचा व्यवसाय करणाऱ्यांच्या अंतर्गत स्पर्धेतून ती कार जाळण्यात आल्याचे बोलले जात आहे.

कारला पेटवून देण्याआधी त्या कारमधील सुगंधी तंबाकूच्या बऱ्याच पेट्या काढून दुसऱ्या वाहनात टाकण्यात आल्या. त्यानंतर कारला पेटवून दिल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी त्या अर्टिगा कारचा चालक विनोद भुसारी (रा.केशोरी, जि.गोंदिया) आणि कारमधील दुसरी व्यक्ती रिंकू पटेल (रा.नवेगावबांध) यांनी पोलिसात वेगळीच तक्रार दिली. त्यात त्यांच्या कारला अडवून त्यांच्याकडील 1 लाख 20 हजार रुपये लुटण्यात आल्याचे म्हटले आहे.

सुगंधी तंबाखूच्या अनधिकृत वाहतूक आणि विक्रीतील जुन्या व्यावसायिकाने स्पर्धक बनून तयार झालेल्या नवीन व्यावसायिकाला अद्दल घडविण्यासाठी हे कृत्य घडवून आणल्याचे बोलले जाते. जळालेल्या कारमध्ये काही सुगंधी तंबाखूचे डबे आढळले. त्यावरून ती गाडी छत्तीसगडमधून सुगंधी तंबाखूच्या आयातीसाठी वापरली जात होती हे जवळजवळ स्पष्ट होत आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या खोलात जाऊन कोरची पोलिस अर्टिगा वाहनातून होणाऱ्या सुगंधी तंबाखूच्या वाहतुकीसाठी जबाबदार व्यक्ती आणि या घटनेस जबाबदार व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.