गडचिरोली : नक्षलवाद्यांनी कोरची तालुक्यातील एका इसमाची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. शनिवारी रात्रीच त्याची हत्या करण्यात आली होती. नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी ही हत्या झाली. विशेष म्हणजे गेल्या १५ नोव्हेंबरपासून नक्षलवाद्यांनी केलेली ही चौथी हत्या आहे.
नक्षल सप्ताहाच्या निमित्ताने भामरागड तालुक्यात बॅनर व पत्रकेही आढळली होती. रविवारी सकाळी कोरचीपासून 14 किलोमीटर अंतरावर गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मुरकुटी येथे चमरा मडावी या इसमाची हत्या झाल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चमरा हा कट्टर नक्षल समर्थक होता. त्याची बहीण एमएमसी झोनमध्ये विस्तार प्लाटून-3 ची माओवादी सदस्य असून ती डीव्हीसीएमची पत्नी आहे.
मृतदेहाजवळ सापडलेल्या पॅाम्प्लेटमध्ये चमरा हा आधी नक्षलवाद्यांसाठी काम करत होता, पण नंतर तो अनेक कंत्राटदारांकडून नक्षलवाद्यांच्या नावावर पैसे गोळा करत होता. शिवाय तो पोलिस खबरी म्हणूनही काम करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
परंतू तो पोलिसांचा खबरी नव्हता असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. नक्षलवाद्यांना राऊंड (बंदुकीच्या गोळ्या) पुरवण्याच्या प्रयत्नात त्याला गेल्यावर्षी मध्यप्रदेशातील बालाघाट येथे अटक करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी त्याची तुरुंगातून सुटकाही झाली होती, असे पोलिसांनी सांगितले. या खुनाचा अधिक तपास गडचिरोली पोलिस करत आहेत.