वाघाच्या शिकारीचे तार शोधण्यात वनविभागाला यश येणार का?

आरोपींना एमसीआर, कनेक्शन कुठपर्यंत?

गडचिरोली : अवघ्या वर्षभरात गडचिरोली जिल्ह्यात अतिसंरक्षित अशा चार वाघांची शिकार होण्याचा प्रकार गंभीर मानला जातो. यातील चातगाव वनपरिक्षेत्रात झालेल्या दोन शिकारीचे आंतरराष्ट्रीय तार उघडकीस आणण्यात वनविभागाला यश आले. त्यातील आरोपींनी गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या वाघांच्या शिकारींची कबुलीही दिली. पण अलिकडे पुन्हा एकदा चातगाव आणि आता भामरागड वनविभागातील एटापल्ली परिक्षेत्रात झालेल्या वाघांच्या शिकार प्रकरणात खोलवर जाऊन तपास करण्याआधीच आरोपींना न्यायालयीन कोठडीही मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

विशेष म्हणजे एटापल्ली वनपरिक्षेत्रातील या शिकारीची माहिती त्या भागातील वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या आधी छत्तीसगड वनविभागाला कळली. यावरून भामरागड किंवा आलापल्ली वनविभागातील अधिकारी गाफिल असतात, की वाघाची कातडी आणि त्याच्या अवयवांची विक्री करणाऱ्या टोळीशी काही कनिष्ठ अधिकाऱ्यांचे लागेबांधे आहे? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

एटापल्ली ते जीवनगट्टा मार्गावर दुचाकीवरून वाघाची कातडी घेऊन जाताना दि.२९ नोव्हेंबरच्या पहाटे दोन स्थानिक लोकांना पकडण्यात आले होते. छत्तीसगड वनविभागासोबत केलेल्या संयुक्त कारवाईमुळे हे शक्य झाले. महिनाभरापूर्वी त्यांनी वाघाची शिकार केल्याची कबुलही दिली. आता वाघाची कातडी नेमकी कुठे नेली जात होती, ती कोणाला किती रुपयांमध्ये विकली जाणार होती. यासाठी त्यांना कोण मदत करत होते, अशा प्रश्नांच्या माध्यमातून या प्रकरणाच्या खोलवर जाऊन तपास करणे वनविभागाला सहज शक्य आहे. त्यासाठी प्रकरणातील चारही आरोपींच्या वनकोठडीत वाढ करणे गरजेचे होते. पण त्यांना एमसीआर देण्यात आला. यामुळे अतिसंरक्षित प्राण्यांची शिकार होऊनही हे प्रकरण स्थानिक पातळीवरच गुंडाळले जाणार नाही ना? अशी शंका घेण्यास वाव निर्माण होत आहे.

यासंदर्भात भामरागड वनविभागाचे उपवनसंरक्षक शैलेष मीना यांना विचारले असता त्यांनीही आरोपींना आणखी वनकोठडी मिळणे गरजेचे होते असे सांगितले. आतापर्यंत वाघाची शिकार झाली कशी यावर तपास केंद्रीत होता, आता त्या कातडी किंवा अवयवांच्या तस्करीकडे लक्ष केंद्रीत करणार असल्याचे त्यांनी ‘कटाक्ष’सोबत बोलताना सांगितले.