गडचिरोली : जिल्ह्यात दारुबंदी असताना अवैधरित्या इतर जिल्ह्यातून होणाऱ्या दारुच्या वाहतुकीवर पोलिसांकडून कारवाया केल्या जातात. 2017 ते 2023 या कालावधीत गडचिरोली पोलिस स्टेशनच्या हद्दीत 510 गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या 1 कोटी 35 लाख 79 हजार रुपयांच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या रोड रोलर चालवून नष्ट करण्यात आल्या. पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कार्यवाही केली. रोलरखाली चुरडलेल्या काचेच्या आणि प्लास्टिकच्या बाटल्यांचा चुराडा खोल खड्ड्यात पुरण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांच्या परवानगीने गडचिरोलीचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांनी राज्य उत्पादक शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक चं.वि. भगत यांच्या उपस्थितीत ही कार्यवाही केली. यात दारुबंदीच्या गुन्ह्यातील जप्त देशी दारुच्या 90 मिली मापाच्या प्लास्टीक बाटल्या, विदेशी दारुच्या 200 मिली मापाच्या बाटल्या, विदेशी दारुच्या 750 मिली मापाच्या काचेच्या बाटल्या, विदेशी दारुच्या 375 मिली मापाच्या बाटल्या, विदेशी दारुच्या 180 मिली मापाच्या काचेच्या बाटल्या, तसेच बिअरच्या 650 मिली मापाच्या काचेच्या बाटल्या, बिअरच्या 500 मिली मापाच्या बिअरच्या कॅनचा समावेश आहे. पंचासमक्ष जेसीबीच्या सहाय्याने 15 बाय 15 चा खोल खड्डा खोदुन रोड रोलरच्या सहाय्याने बाटल्यांचा चुराडा करून तो खड्ड्यात टाकून बुजविण्यात आला.
ही कारवाई वरिष्ठांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी अरुण फेगडे, हवालदार चंद्रभान मडावी आणि अंमलदारांच्या उपस्थितीत पार पडली.