लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या तरुणाला शिक्षा

20 वर्षांच्या कारावासासह 50 हजारांचा दंड

गडचिरोली : एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आणि लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या युवकाला न्यायालयाने झटका दिला. त्याला तब्बल 20 वर्षांच्या कारावासासह 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलगी ही शिक्षण घेण्याकरिता चामोशी येथे आपल्या आजोबांकडे राहायला होती. यावेळी आरोपी राहुल दिलीप लटारे (23 वर्षे), रा.गव्हार मोहल्ला, चामोर्शी, हा त्या मुलीच्या शाळेत जाताना तिच्या मागे मागे जायचा. परंतु ती त्याच्याकडे लक्ष देत नव्हती. त्यानंतर आरोपीने तिला वारंवार मोबाईलवर फोन करुन प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला तो फिरायला घेऊन जायचा. त्यानंतर त्याने घरी एकटा असताना पिडीतेला घरी बोलवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मित्राच्या घरीसुध्दा बोलावून तो तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवत होता. त्यानंतर आरोपीने पीडित मुलीशी संबंध तोडून तुझ्याशी लग्न करणार नाही, तू माझ्याशी बोलायचे नाही, असे म्हणून भांडण केले. यामुळे पीडित मुलीने त्याच्याविरूद्ध दि.3 नोव्हेंबर 2019 रोजी चामोर्शी पोलिसात तक्रार दाखल केली.

त्यामुळे आरोपी राहुल लटारे याला अटक करून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले. वैद्यकीय पुरावा, साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राहय धरून न्यायालयाने आरोपी राहुल दिलीप लटारे याला विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, उत्तम मुधोळकर यांनी विविध कलमांखाली एकूण 20 वर्षांचा सश्रम कारावास आणि 50 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पीडितेला देण्याचा आदेश देण्यात आला.

सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल एस.प्रधान यांनी कामकाज पाहिले. तसेच गुन्हयाचा तपास पोउपनि निशा खोब्रागडे यांनी केला.