सुगंधी तंबाखू वाहतुकीच्या धंद्यात त्यांना नको होता प्रतिस्पर्धी, म्हणून केली लुटमार

कार जळीत प्रकरणात तिघांना अटक

गडचिरोली : गेल्या 25 मे रोजी गडचिरोली जिल्ह्यातील कोरचीजवळ एका इर्टिगा कारला अडवून त्यातील सुगंधी तंबाखू लुटून कार पेटवून देण्यात आली होती. याप्रकरणी गोंदिया जिल्ह्यातील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. छत्तीसगडमधून अवैधपणे सुगंधी तंबाखू आणून तो गोंदिया जिल्ह्यात पुरवठा करण्याच्या व्यवसायातील स्पर्धेतून हे कृत्य केल्याची कबुली अटकेतील आरोपींनी पोलिसांकडे दिली आहे.

पोलिस सुत्रानुसार, गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध येथील व्यापारी देवेश पटेल याने अनधिकृतपणे सुगंधी तंबाखू वाहतुकीसाठी केशोरी येथील सोपान पेशने यांचे इर्टीगा (एम.एच. 35, ए.जी. 7001) हे वाहन भाड्याने घेतले होते. गेल्या 25 मे रोजी तो चालकासह छत्तीसगड येथील वासडी येथे जावून सुगंधी तंबाखु गडचिरोलीमार्गे गोंदिया जिल्ह्यात नेत असताना कोरची पोलिसांच्या हद्दीतील मसेलीच्या जंगल परिसरात अज्ञात इसमांनी त्यांचे वाहन अडवून त्यांना शस्रांचा धाक दाखवून आणि डोळ्यावर पटी बांधून स्वत:च्या वाहनात बसवले. त्यांचे सुगंधी तंबाखू असणारे वाहन दुसरीकडे नेवून त्यातील तंबाखु जबरीने काढून घेऊन कोरचीजवळ नेऊन पेटवून दिले. यासंदर्भात इर्टिगा चालकाच्या तक्रारीवरून कोरची पोलिस स्टेशनला दरोडा आणि जाळपोळीचा गुन्हा नोंद करून तपास करण्यात आला.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी प्रकरणाचे गांभीर्य पाहून स्थानिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण सोपविले. त्यांनी 3 पथके तयार करून संपूर्ण परिसर पिंजून काढला. तसेच गोपनिय बातमीदारांच्या मदतीने माहिती मिळवली. त्यानुसार या परिसरात मागील 2-3 वर्षात अशाच पद्धतीने काही लोकांना मारहाण देखिल झाल्याची माहिती मिळाली. परंतु संबंधीत लोक अवैध व्यवसायाशी निगडीत असल्याने आणि आरोपींची दहशत असल्याने त्यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिली नव्हती.

स्थानिक गुन्हे शाखेने तपासाचे धागे एकत्र करून माहिती संकलित केली असता गडचिरोली-गोंदिया सीमावर्ती भागातील राजोली (जि.गोंदिया) येथील सुगंधी तंबाखुची तस्करी करणारा शोएब वकिल सय्यद हा त्याच्या साथीदारांसह त्याचे व्यावसायिक प्रतिस्पर्धी यांच्यात दहशत निर्माण करण्यासाठी असे गुन्हे करीत असल्याची माहिती मिळाली.

दरम्यान एलसीबीच्या पथकाने राजोली येथे जावून ईजराईल हकिम शेख, लोकेश हंसराज नगारे व प्रशांत मोहन सांगोळे यांना ताब्यात घेवून कसून विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्राची कबुली दिली. त्यांच्यासह आणखी काही साथीदार असल्याचे समोर आले. या गुन्ह्राचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले करीत आहे.

निर्भिडपणे द्या तक्रार

यासारखा प्रकार अथवा घटना इतर कोणासोबतही घडली असल्यास त्यांनी नि:संकोचपणे व निर्भीडपणे पोलिस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार द्यावी. त्यांच्या तक्रारीची योग्य दखल घेण्यात येईल, असे आवाहन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी गडचिरोली जिल्ह्रातील सर्व नागरिकांना केले आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी, सपोनि राहुल आव्हाड, पोलिस उपनिरीक्षक सरीता मरकाम, पोहवा राकेश सोनटक्के, देवेंद्र बांबोळे, अकबरशहा पोयाम, पोहवा पुष्पा कन्नाके, पो.ना. शुक्राचारी गवई, पंकज भगत, माणिक निसार, पोशि माणिक दुधबळे, रोहन जोशी, सुनिल पुठ्ठावार, सचिन घुबडे, संजु कांबळे, कृष्णा परचाके, प्रशांत गरफळे, दीपक लोणारे, विनोद चापले, मपोशि सोनम जांभुळकर, फोटोग्राफर देवेंद्र पिदुरकर आदींनी केली. या गुन्ह्याच्या तपासासाठी गडचिरोली व सायबर पोलिस स्टेशनचे पोउपनि निलेशकुमार वाघ, नापोशि श्रीनिवास संगोजी, तसेच पोलिस स्टेशनचे पोउपनि बालाजी सोनुने व चालक पोहवा शंकर अरवेल्लीवार यांनी परिश्रम घेतले.