अहेरी : स्वत:च्या घरासमोरील अंगणात खाटेवर झोपून असलेल्या व्यक्तीच्या अंगावर मध्यरात्री अज्ञात आरोपीने पेट्रोल टाकून पेटवले. ही रहस्यमय घटना अहेरी तालुक्यातील नक्षलग्रस्त छल्लेवाडा या गावात घडली. चरणदास गजानन चांदेकर (48 वर्ष) असे जळालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गंभीर अवस्थेत त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथे आणण्यात आले.
ग्रामीण भागातील नागरिक उन्हाळ्यात रात्रीच्या वेळी घरासमोरच्या अंगणातच झोपतात. अहेरी तालुक्यात येत असलेल्या छल्लेवाडा येथील रहिवासी असलेले चरणदास चांदेकर हेसुद्धा नेहमीप्रमाणे घरासमोरील अंगणात खाटेवर झोपलेले होते. दरम्यान मध्यरात्री अज्ञात कोणीतरी त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यावेळी त्यांच्या बाजूला दुसऱ्या खाटेवर झोपून असलेल्या कुटुंबातील सदस्यांना ही बाब समजताच त्यांनी आग विझवली. परंतु तोपर्यंत चरणदास हे गंभीरपणे भाजले गेले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी चंद्रपूरला हलवण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते.
हे कृत्य कोणी केले याला उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांपुढे येऊन ठेपले आहे.