14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरी, कोरचीतील 21 वर्षीय तरुणाला अटक

खोटं सांगून नेऊन घेतला गैरफायदा

कोरची : नगरातील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला खोटा निरोप देऊन युवकाने आपल्या घरी बोलवले आणि तिच्यावर जबरीने लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणातील आरोपी मनिष भोयर (21 वर्ष) याला पोलिसांनी अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पिडीत मुलीचे आई-वडील तिला कोरचीतील तिच्या मावशीच्या घरी ठेवून आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील मासे कंपनीत रोजमजुरीसाठी गेले होते. दरम्यान रात्रीला मावशी स्वच्छतागृहात गेली असल्याची संधी साधत आरोपी मनीष भोयर याने पीडित मुलीला ‘तुझा काका माझ्या घराकडे आला आहे, तुला बोलवत आहे’, असे खोटे सांगून तिला आपल्या घराकडे नेले आणि घरी कोणी नसल्याने तिचे तोंड दाबून तिच्यावर बळजबरी केली.

आपल्या घरी परतल्यानंतर पीडित मुलीच्या कपड्याला रक्त माखल्याचे बघून मावशीने विचारणा केली. पण मुलगी प्रचंड घाबरलेली असल्याने ती नेमके काय आणि कसे घडले हे सांगू शकली नाही. दुसऱ्या दिवशी संपूर्ण घटना तिने रडतरडत सांगितली. यानंतर या प्रकाराची तक्रार मिळताच कोरची पोलिसांनी घटनास्थळी येऊन चौकशी करून मनिष भोयर याला अटक केली.

पीडित अल्पवयीन मुलीची कुरखेडा येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात कोरची पोलीस स्टेशनचे निरीक्षक शैलेंद्र ठाकरे करीत आहेत.