अहेरी : भारतीय जनता पक्षाने अहेरी विधानसभा क्षेत्रावर नजर केंद्रीत करत विशेष सदस्यता नोंदणी मोहिमेचे आयोजन केले आहे. 1 ते 15 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री आणि अहेरी विधानसभा क्षेत्राचे सदस्य नोंदणी प्रभारी मा.खा.अशोक नेते यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
देशभरात भाजपने 1 ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत विशेष सदस्यता नोंदणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने अहेरी विधानसभेत 5 जानेवारी रोजी विशेष सदस्यता नोंदणी कार्यक्रम पार पडला. आलापल्लीच्या शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत मा.खा.नेते यांनी या मोहिमेची सविस्तर माहिती दिली.
भाजपच्या सदस्यत्वासाठी नागरिकांना 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल देऊन नोंदणी करता येते. मिस कॉल दिल्यानंतर आलेल्या संदेशातील लिंकवर आपली संपूर्ण माहिती भरून सदस्यता नोंदविता येते. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क उपलब्ध नाही, तिथे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरून सदस्यता नोंदणी केली जात असल्याचे मा.खा.नेते यांनी सांगितले.
अहेरी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक बुथवर कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. ही मोहीम व्यापक स्वरूपात यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत, असेही नेते यांनी सांगितले. भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. अधिकाधिक नागरिकांना पक्षाशी जोडणे हे सदस्यता नोंदणी मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. डिजिटल व ऑफलाइन पद्धतींचा वापर करून विविध स्तरांवरील नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेला प्रामुख्याने ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष विनोद आकनपल्लीवार, मच्छिमार सेलचे अध्यक्ष मोहन मदने, जिल्हा सचिव पोशालू चौधरी, तालुका महामंत्री सुकमल हलदार, अशोक आत्राम, अभिजीत शेंडे, अंकुश शेंडे, हर्षित वर्मा आणि सागर बांबोळे यांची उपस्थिती होती.