गडचिरोली : दारुबंदी असताना चंद्रपूर जिल्ह्यातून मालवाहू वाहनाने अवैधरित्या दारुची आयात करण्याचा प्रयत्न स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हाणून पाडला. यात 14 लाख रुपयांचे विदेशी दारूचे बॅाक्स आणि वाहन जप्त करण्यात आले. ही कारवाई मध्यरात्रीच्या सुमारास मुलचेरा तालुक्यातील कोपरअली गावाजवळ करण्यात आली.
दारू तस्कर मनोज मजुमदार हा आपल्या बोलेरो पिकअप वाहनाने चंद्रपूर-मुलचेरा-एटापल्ली अशी दारूची खेप आणत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.चे सहायक पोलीस निरीक्षक राहुल आव्हाड व त्यांच्या पथकाने कोपरअली गावाजवळ सापळा रचला. मध्यरात्री ते वाहन भरधाव वेगाने येताना दिसले. पोलिसांनी ते वाहन अडवून तपासणी केली असता त्यात विदेशी दारू व बिअरच्या 143 पेट्या माल (किंमत अंदाजे 14 लाख रुपये) मिळून आला. यासोबत बोलेरो पिकअप वाहन (एम.एच.33, टी 5095) किंमत अंदाजे 7 लाख रुपये असा एकुण 21 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या घटनेच्या अनुषंगाने मुलचेरा ठाण्यात गुन्हा दाखल करून दारू तस्कर मनोज मजुमदार (45 वर्ष) रा.एटापल्ली याला अटक करण्यात आली. मुजुमदार याच्यावर यापूर्वीही गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये दारू तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल आहे.