Home दैनंदिन बातम्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या चौथ्या यादीत 225 शेतकरी पात्र

शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या चौथ्या यादीत 225 शेतकरी पात्र

एकूण 10,885 शेतकऱ्यांना लाभ

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची चौथी यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात 225 शेतकरी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंतच्या चारही याद्या मिळून जिल्ह्यातील 10 हजार 885 शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र ठरले आहेत.

या योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत वितरित झालेल्या व 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकित असलेल्या आणि दि.31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या पीक कर्ज व पुनर्गठित / फेरपुनर्गठित कर्जास रुपये दोन लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येत आहे.

या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. यासाठी शासनाने महाआयटी यांची नियुक्ती केली आहे. या योजनेसाठी महाआयटी यांनी तयार केलेल्या योजना पोर्टलवर जिल्ह्यातील बँकांनी एकुण 15 हजार 149 थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे.

महाआयटी यांनी संगणकीय संस्करण केलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत पहिल्या यादीमध्ये 4371, दुसऱ्या यादीत 3610, तिसऱ्या यादीत 2679, तर चौथ्या यादीत 225 अशा एकुण 10 हजार 885 एवढ्या पात्र शेतकऱ्यांचा समावेश आहे. महाआयटी यांनी संगणकीय संस्करण करुन आधार प्रमाणिकरण झालेल्या शेतकऱ्यांपैकी 6513 पात्र लाभार्थ्यांना कर्जमुक्तीची रक्कम रु.38 कोटी 24 लाख रुपये शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा केली आहे.

22 ऑक्टोबर 2026 रोजी एकापेक्षा जास्त बँकांमध्ये कर्ज खाती असलेल्या आणि 2 लाखापेक्षा कमी थकबाकी असलेल्या एकुण 216 पात्र शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिध्द करण्यात येत आहे. जिल्हानिहाय यादी परिशिष्ट अ व बँकनिहाय यादी परिशिष्ट व मध्ये सोबत जोडले आहे. सदर लाभार्थ्यांची यादी बँक शाखा, विकास संस्था व ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

यादीतील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येत आहे. या यादीमध्ये एकापेक्षा जास्त बँकेकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यादीतील शेतकऱ्यांच्या कर्जबाकीची रक्कम 31 मार्च 2026 रोजीची आहे. 1 एप्रिल 2026 नंतरचे व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी 31 मार्च 2026 रोजीच्या कर्ज थकबाकीची खातरजमा करुन घ्यावी.

यादीत नाव असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केद्रांत जाऊन इ-केवायसी करुन घ्यावी, जेणेकरुन ते सदर योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरतील. गडचिरोली जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांना लाभ तातडीने मिळण्याकरीता नजिकच्या आपले सरकार केंद्रावर शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, गडचिरोली यांनी केले आहे.