भामरागड : तालुक्यातील सर्वाधिक दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिनागुंडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील बिनागुंडा नाल्यावर पोलीस जवान आणि गावकऱ्यांनी श्रमदान करत 60 मीटर लांबीचा पूल उभारला. याच तालुक्यात मागील महिन्यात नेलगुंडा येथे अशाच पद्धतीने पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने श्रमदानातून पूल उभारला होता. पोलिसांचा हा समाजाभिमुख उपक्रम नागरिकांचे जीवनमान सुकर करण्यासाठी महत्वाचा ठरत आहे.
जिल्ह्यातील नक्षलग्रस्त दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषत: पावसाळ्यात नाले व ओढे प्रवाहित होत असल्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होतात. अशातच पोलीस मदत केंद्र बिनागुंडा हद्दीतील बिनागुंडा ते लाहेरी मार्गावरील बिनागुंडा गावाजवळच्या नाल्यामुळे वाहतुकीचा मार्ग बंद होत होता. त्यामुळे वैद्यकीय मदत मिळणे अशक्य होऊन शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते.
या समस्येवर उपाय म्हणून पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामभेटी दरम्यान योग्य बंदोबस्त लाऊन पोलीस मदत केंद्र बिनागुंडाचे पोलीस अधिकारी व अंमलदार, सीआरपीएफ, एसआरपीएफ व सी-60 चे अधिकारी व अंमलदारांनी एक ट्रॅक्टर आणि एका जेसीबी मशीनच्या सहाय्याने 8 पाईपचा वापर करुन श्रमदानातून 60 मीटर लांबीचा नवीन पूल तयार केला. त्यामुळे येथील नागरिकांचे पुलावरुन येणे-जाणे सुरू झाले.
गडचिरोली पोलिसांच्या या समाजभिमुख कार्यामुळे नागरिकांच्या मनात गडचिरोली पोलीस दलाबाबत एक आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. पोलीस दल केवळ सुरक्षेसाठीच नव्हे, तर समाजाच्या विकासासाठीही कटिबध्द आहे, हे या उपक्रमाव्दारे अधोरेखित झाले.
अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बी.जे. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, (भामरागड) हेमंत चांदेवार यांच्या नेतृत्वात पोलीस मदत केंद्र बिनागुंडाचे प्रभारी अधिकारी पोनि.तुकाराम नलवडे, परि.पोउपनि.मोरे, परि.पोउपनि. शिरसाट, परि.पोउपनि. यलगंदकर, तसेच एसआरपीएफचे पोउपनि.ए.आर. चांगण, सी-60 चे पोउपनि.मनोहर पटले व पोलीस अंमलदारांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले.
































