दोन दुचाकींच्या धडकेत खाली पडून दुचाकीस्वार आला ट्रकच्या चाकात

बालिकेचाही मृत्यू, तीन जण जखमी

गडचिरोली : दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील सर्वजण खाली पडले. यात सिमेंट रस्त्यावर आपटल्या गेल्याने एका बालिकेचा मृत्यू झाला तर खाली पडलेला एक दुचाकीस्वार ट्रकच्या मागच्या चाकात सापडून ठार झाला. हा अपघात चामोर्शी तालुक्यातील येणापूरजवळ सोमवारी दुपारी घडला. रामेश्वर गंगाधर कुंभमवार (रा.अनखोडा) आणि रियांशी धनराज वाढई (रा.जामगिरी) या चार वर्षीय बालिकेचा मृतांमध्ये समावेश आहे.

प्राप्त माहितीनुसार, रामेश्वर कुंभमवार हे प्रकाश नागुलवार यांच्यासोबत दुचाकीने चामोर्शीकडे जात होते, तर दुसऱ्या बाईकवर धनराज वाढई, पुष्पा वाढई, साईबाई वाढई या तिघा जणांसह रियांशी (4 वर्ष) ही बालिका असे चौघे जण जामगिरीकडून येत होते. हे दोन्ही दुचाकी वाहन समोरासमोर धडकून सर्वजण खाली कोसळले. त्याचवेळी बाजुने जात असलेल्या लोहखनिजाच्या ट्रकच्या मागच्या चाकात रामेश्वर कुंभमवार यांचे डोके सापडले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातातील जखमींना चामोर्शी येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गडचिरोलीत हलविण्यात आले. आष्टी पोलिस या अपघाताची चौकशी करीत आहेत.