पोर्ला येथे ग्रामगीता वाचन सप्ताहाचा समारोप, दशमुखे परिवाराचे आयोजन

ग्रामगीतेचा प्रसार घरोघरी व्हावा- ईचोडकर

गडचिरोली : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेल्या ग्रामगीतेचा प्रचार व प्रसार घरोघरी पोहोचवणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करावे, असे आवाहन गडचिरोली पंचायत समितीचे माजी सभापती मारोतराव ईचोडकर यांनी पोर्ला येथे केले.

तुळसाबाई किसनजी दशमुखे स्मृती भवन व शिव मंदिर पोरला येथे तीन दिवसीय ग्रामगीता वाचन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक वासुदेवराव भोयर, केशवराव दशमुखे, सिंधूबाई दशमुखे, बाजार समितीचे संचालक बापूजी फरांडे, मुखरु लाडवे, रमेश इंगळे, चंद्रभान जगताप, हभप डोमाजी झरकर महाराज, माजी सरपंच परशुराम बांबोळे, राजेंद्र जरूरकर आदी उपस्थित होते.

यावेळी ईचोडकर म्हणाले, केशवराव दशमुखे परिवाराच्या वतीने पोर्ला येथे अनेक वर्षापासून ग्रामगीता वाचन सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यांचे कार्य अतुलनिय असून ग्रामगीतेच्या माध्यमातून लोकांना जागरूक करून ग्रामगीतेचा प्रचार करीत आहेत. या कामी सर्वांनी सहकार्य करून राष्ट्रसंतांचे विचार आचरणात आणण्याचे कार्य करावे, असेही ते म्हणाले. यावेळी सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक देविदास भोयर यांनीसुद्धा आपले विचार व्यक्त केले.

तीन दिवस ग्रामगीतेचे वाचन हभप डोमाजी महाराज झरकर यांच्या वाणीतून करण्यात आले. यावेळी पोर्ला येथील निरंकारी भजन व वसा येथील बाल भजन मंडळाने भजनाद्वारे उत्कृष्ट साथ दिली. मान्यवरांच्या हस्ते काला फोडण्यात आला. तसेच 95 वर्षीय नाट्य कलावंत लहानुजी मोहूर्ले, केशवराव दशमुखे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पोर्ला येथील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विलास दशमुखे यांनी, तर आभार विनोद दशमुखे यांनी मानले.