गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात गुरूवारी (दि.28) ईच्छुक उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी निवडणूक निरीक्षक अनिमेष कुमार पराशर व जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांच्या उपस्थितीत करण्यात आली. विशेष म्हणजे 12 पैकी पूर्ण 12 नामनिर्देशनपत्र वैध ठरले आहेत. यात मिलींद रामजी नरोटे आणि विनोद गुरूदास मडावी यांनी ए.बी. फॉर्म सादर न केल्याने त्यांचे अर्ज अपक्ष म्हणून वैध ठरविण्यात आले. या उमेदवारांपैकी ज्यांनी 30 मार्चला निवडणुकीतून माघार घेतली नाही ते निवडणूक लढत असल्याचे ग्राह्य धरून त्यांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.
निर्भय व हिंसामुक्त निवडणुकीसाठी योगदान द्या
लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील निवडक जिल्ह्यात गडचिरोलीचा समावेश असून या मतदार संघावर संपूर्ण देशाचे लक्ष केंद्रीत झाले आहे. त्यामुळे आपले काम दाखविण्याची हीच संधी आहे. येथील निवडणूक निर्भय, हिंसामुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी पूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन निवडणूक निरीक्षक अनिमेष कुमार पराशर यांनी अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या आढावा बैठकीत केले.
या बैठकीत पराशर यांच्यासह निवडणूक खर्च निरिक्षक एस.वेणुगोपाल, तसेच कायदा व सुव्यवस्था निरीक्षक राजपाल सिंग यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने, सहायक निवडणूक अधिकारी राहुल मीना (गडचिरोली), मानसी (देसाईगंज) आदित्य जीवने (अहेरी), किशोर घाडगे (चिमूर) संदीप भस्के (ब्रह्मपुरी) डॉ.रवींद्र होळी (आमगाव), अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड (देवरी), विवेक साळुंखे (कुरखेडा), सहायक जिल्हाधिकारी ओमकार पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार आदी यावेळी उपस्थित होते.
निवडणूक निरीक्षक पराशर म्हणाले की, 75 टक्केपेक्षा जास्त मतदान होण्यासाठी निवडणूक यंत्रणेने घरोघरी प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क करून त्यांना मतदानासाठी आवाहन करावे. विशेषत: नवयुवकांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढेल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. लांब चालत जाव्या लागणाऱ्या मतदान केंद्रांवर सुदृढ व निरोगी मतदान अधिकारी नियुक्त करावे, सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात, मतदान यंत्रांची हाताळणी करताना त्याबाबत राजकीय प्रतिनिधींना अवगत करावे, मतदान व मतमोजणी प्रक्रिया तत्परतेने व्हावी यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण द्यावे, आदी सूचना त्यांनी केल्या.
जिल्ह्यात मतदान केंद्र किती आहेत, त्यातील किती संवेदनशील आहेत, मतदारांची संख्या, सर्व्हीस व्होटर, निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचारी, 85 वर्षावरील तसेच दिव्यांग मतदार यांना टपाली मतपत्रिकेची सुविधा, मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रिया, उपलब्ध मनुष्यबळ, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, सुरक्षा यंत्रणा याबाबत निवडणूक निरीक्षकांनी माहिती जाणून घेत केलेल्या कार्यवाहीचा यंत्रणेकडून आढावा घेतला.
जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी सादरीकरणाद्वारे निवडणुकीशी संबंधित माहिती दिली, तर जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी सुरक्षाविषयक उपाययोजनांची माहिती दिली. बैठकीला सर्व निवडणूक नोडल अधिकारी उपस्थित होते.