गडचिरोली : गडचिरोली पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये छत्तीसगडच्या सीमेवर बुधवारी रात्री आणि गुरूवारच्या पहाटे जोरदार चकमक उडाली. यानंतर नक्षलवाद्यांनी जंगलात पळ काढला. घटनास्थळी राबविलेल्या शोधमोहिमेत नक्षलवाद्यांचे साहित्य आणि स्फोटकात वापरल्या जाणाऱ्या जिलेटिनच्या कांड्या, वायर, बॅटऱ्या, सोलर पॅनल आणि इतर साहित्य पोलिसांच्या हाती लागले. यावरून लोकसभा निवडणुकीदरम्यान घातपात घडविण्याचा नक्षलवाद्यांचा डाव असल्याचे उघडकीस आले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा डाव हाणून पाडण्यात आला.
कसनसूर चातगाव दलम आणि छत्तीसगडच्या औंधी दलमचे काही सशस्त्र नक्षली छत्तीसगड सीमेवरील भुमकन गावाजवळ तळ ठोकून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे विलंब न करता एएसपी (प्रशासन) कुमार चिंता यांच्या नेतृत्वाखाली ताबडतोब नक्षलविरोधी ऑपरेशन सुरू करण्यात आले. सीआरपीएफचे जवान, सी-60 जवान आणि एका क्युआरटी टिमकडून परिसरात नक्षलवाद्यांचा शोध सुरू असताना त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्यांना मोहिमेवर असलेल्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
बुधवारच्या संध्याकाळी 6 वाजता, त्यानंतर रात्री 11.30 वाजता आणि गुरूवारी पहाटे 4.30 वाजता अत्यंत कमी प्रकाश असतानाही पोलिस दलाच्या जवानांनी नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. वाढता दबाव आणि अंधाराचा फायदा घेत नक्षलवादी गोळीबाराच्या ठिकाणाहून पळून गेले.
सकाळी उजाडल्यानंतर पोलिस दलाने त्या परिसरात शोध सुरू केला असता मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांचे सामान आणि इतर साहित्य सापडले. त्यात वायर्स, जिलेटिनच्या कांड्या, बॅटऱ्या, सोलर पॅनल इत्यादी जप्त करण्यात आले.