केंद्रावर मतदान यंत्र कसे हाताळायचे? कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण

निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणेची तयारी

देसाईगंज : लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय वातावरण अद्याप गरम झालेले नसताना गडचिरोलीत प्रशासकीय यंत्रणेची तयारीही जोरात सुरू आहे. निवडणुकीच्या कामात ड्युटी लागलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना ईव्हिएम हाताळण्याचे प्रशिक्षण तालुकास्थळी दिले जात आहे. देसाईगंज येथील नगर परिषद सांस्कृतिक भवनात पहिल्या टप्यातील प्रशिक्षण देण्यात आले. यात प्रामुख्याने व्हिव्हिपॅट, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आदींची महिती प्रात्यक्षिकांसह देण्यात आली.

निवडणुकीच्या कामावर कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पोस्टल मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी मतदार यादीत आपला अनुक्रमांक, यादीतील भाग क्रमांक याविषयी कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली. कर्मचाऱ्यांनी यादीमध्ये सदर माहिती शोधली. तसेच निवडणूक प्रक्रियेविषयक सविस्तर माहिती घेऊन प्रक्रिया व्यवस्थित व वेळेत पार पडावी यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले. या प्रशिक्षणाप्रसंगी देसाईगंज उपविभाग कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.