गडचिरोली : गडचिरोलीत आज नक्षलवाद्यांची कधी नव्हे एवढी वाईट अवस्था झाली आहे. या स्थितीचा फायदा घेऊन प्रशासनाने विकासाची गती वाढवली पाहिले, अशी अपेक्षा लोकसत्ताचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे यांनी व्यक्त केली. नक्षलवाद्यांची हिंसा थांबली म्हणजे चळवळ संपली असा समजही करू नये, तेलंगणात 10 वर्षानंतर पुन्हा उफाळत असलेल्या नक्षली कारवाया हे त्याचे ताजे उदाहरण आहे, असा इशाराही त्यांनी दिला. गडचिरोली प्रेस क्लबच्या वतीने आयोजित गडचिरोली गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.
सामाजिक सेवेचा वारसा जपणारे, हेमलकसा (भामरागड) येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत प्रकाश आमटे आणि समीक्षा अनिकेत आमटे या दाम्पत्याला यावर्षीचा ‘गडचिरोली गौरव पुरस्कार’ देऊन पत्रकार दिनी (6 जानेवारी) सन्मानित करण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला अतिथी म्हणून ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार, आ.डॅा.मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य प्रा.डॅा.प्रमोद मुनघाटे, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस क्लबचे अध्यक्ष अविनाश भांडेकर होते.
या पुरस्काराने नवी ऊर्जा मिळाली- आमटे
हा पुरस्कार केवळ आमचा नसून आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या अनेक लोकांचा आहे. आमटे कुटुंबाला समाजसेवेचा वारसा आजोबांपासून (बाबा आमटे) लाभला असला तरी वेगळ्या वातावरणातून आमच्या कुटुंबात येऊन आमच्या कार्यात समरस झालेल्या महिलावर्गाचे श्रम जास्त महत्वाचे आहे, असे सांगत आपल्या जिल्ह्यातील सकारात्मक गोष्टी समोर याव्यात, अशी अपेक्षा अनिकेत आमटे यांनी सत्कारानंतर बोलताना व्यक्त केली. तर या जिल्ह्यासाठी जंगल हा आत्मा आहे, तो हरवू नये अशी अपेक्षा समीक्षा आमटे यांनी व्यक्त केली.
लोक बिरादरी एक्सप्रेस सुरू व्हावी- पोरेड्डीवार
यावेळी ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी आमटे कुटुंबियांच्या सामाजिक योगदानावर प्रकाश टाकत अनिकेत आणि समीक्षा यांचे कौतुक केले. जिल्ह्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याला ताकद दिली पाहिजे. येऊ घातलेल्या वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाचा विस्तार दक्षिणेपर्यंत व्हावा आणि येथून सुरू होणाऱ्या रेल्वेगाडीचे ‘लोक बिरादरी एक्सप्रेस’ असे नामकरण करावे, अशी भावना त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली.
वक्त्यांनी काढले पत्रकारांना चिमटे
यावेळी डॅा.प्रमोद मुनघाटे म्हणाले, पत्रकारितेचे आज कॅार्पोरेटिकरण झाले आहे. अधिकृत नसली तरी अनेक वेळा माध्यमांवर राजकीय सेन्सॅारशिप असल्याचे दिसते. मिडिया हाऊस कोणाच्यातरी दावणीला बांधल्यासारखी स्थिती असते. त्यामुळे खऱ्या पत्रकारांचा कोंडमारा होतो. त्यातून अनेक ज्येष्ठ पत्रकार सोशल आणि डीजिटल मिडियाकडे वळू लागले असल्याची वास्तविकता त्यांनी मांडली. देवेंद्र गावंडे यांनी पत्रकारांविषयी निर्माण झालेली नकारात्मक भावना बदलवा, असे सांगत प्रत्येक पत्रकाराने आपली प्रतिमा जपली पाहिजे, अशी सूचना केली. नक्षलवादावर बोलताना ते म्हणाले, नक्षलवाद्यांनी आदिवासींचा ढाल म्हणून वापर केला म्हणून या जिल्ह्यात चळवळ संपत आहे. पण समस्या चिघळवत ठेवणे ही कीड आहे. नक्षलवादाच्या बाबतीत हे होऊ नये याची काळजी घ्यावी, असे ते म्हणाले.
विकासात पत्रकारांची भूमिका महत्वाची
यावेळी आ.डॅा.मिलिंद नरोटे म्हणाले, काही साध्य करायचे असेल तर केवळ ताकदीने ते होणार नाही. त्यासाठी योग्य तो बदल करणे गरजेचे आहे. गडचिरोलीच्या पत्रकारांनी स्टँडर्ड सेट करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी विकासात्मक कामांत पत्रकारांची भूमिका महत्वाची असल्याचे सांगत समन्वयातून जिल्ह्यातील समस्या दूर करण्यास मदत होऊन विकासाची गती वाढेल, असे सांगितले.
प्रास्ताविक अविनाश भांडेकर यांनी, संचालन मिलिंद उमरे, तर आभार प्रेस क्लबचे सचिव रुपराज वाकोडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रेस क्लबचे उपाध्यक्ष रोहिदास राऊत, कोषाध्यक्ष शेमदेव चापले, सहसचिव सुरेश नगराळे, सदस्य सुरेश पद्मशाली, नंदकिशोर काथवटे, निलेश पटले, विलास दशमुखे, मनोज ताजने, सहयोगी सदस्य मनिष कासर्लावार, संदीप कांबळे व इतर सदस्यांनी सहकार्य केले. यावेळी गीतगायन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. तसेच स्पर्धेचे परीक्षक सुधाकर धात्रक व मारोतराव इचोडकर यांनाही सन्मानित करण्यात आले.