आरमोरी : संताजी बहुउदेशीय सेवा मंडळाच्या वतीने संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी आणि तेली समाज वधू-वर परिचय मेळावा, तसेच ज्येष्ठ व सेवानिवृत्त तथा प्रविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी पार पडला. आरमोरीतील वडसा मार्गावरील संताजी ग्राउंड येथे पार पडला. तेली समाजाला एकसंघ करण्यासाठी अशा मेळाव्यांची आवश्यकता आहे. या माध्यमातून संतांचे विचार तेली समाजात रुजावे, अशी अपेक्षा यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष तथा संताजी स्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रमोद पिपरे यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केली.
यावेळी महाराष्ट्र शासनाने संताजी जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ मंजूर केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करणारा ठराव घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसनराव खोब्रागडे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे, तर मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेचे अध्यक्ष बबनराव फंड, उदघाटक म्हणून गडचिरोलीच्या माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, संताजी स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर वासेकर, सामाजिक वक्ते संजय येरणे, वडसा पं.स.चे माजी सभापती परसराम टिकले, वैरागडचे उपसरपंच भाष्कर बोडणे, ठाणेगावचे पुंडलिकराव जुवारे, मुखरू खोब्रागडे, डॉ.प्रदीप चाफले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या मेळाव्यासाठी आयोजक बुधाजी किरमे, रामभाऊ कुरझेकर, देविदास नैताम, तुळशीराम चिलबुले, विवेक घाटूरकर, शंकरराव बावणकर, प्रा.गंगाधर जुवारे, विवेक घाटुळकर, मिलिंद खोब्रागडे, द्वारकाप्रसाद सातपुते, विलास सातपुते व सर्व तेली समाज युवक-युवतींनी सहकार्य केले.