जिल्ह्यात शनिवारपासून जलजागृती सप्ताह, 75 हजार विद्यार्थी घेणार जलप्रतीज्ञा

'वॅाटर फॅार पीस' संकल्पनेवर उपक्रम

गडचिरोली : दरवर्षी 22 मार्च हा दिवस ‘जागतिक जलदिन’ म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून जलसंपदा विभागामार्फत जिल्ह्यात 16 ते 22 मार्च यादरम्यान जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

पाण्याचे महत्व, पाण्याचे संवर्धन, जलप्रदुषण, पाण्याची गुणवत्ता राखणे याविषयी जनजागृती करण्यासाठी ‘वॅाटर फॅार पीस’ या संकल्पनेवर जिल्हा व तालुकास्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयामध्ये जलप्रतिज्ञा उपक्रम राबविण्यात येणार आहे. विशेषतः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जिल्हास्तरावर 75 हजार विद्यार्थ्यांपर्यंत जलप्रतिज्ञा कार्यक्रम पोहचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमाचे उद्घाटन 16 मार्च रोजी गडचिरोली पाटबंधारे विभाग येथे सकाळी 10 वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांच्या हस्ते, तसेच जिल्ह्यातील अन्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे यांनी केले आहे.