गडचिरोली : शेतकऱ्यांचा सण म्हणून ओळखल्या जाणारा पोळा आणि तान्हापोळा आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी गडचिरोलीची बाजारपेठही सज्ज झाली आहे. तान्हा पोळ्याला माती आणि लाकडांचे बैल किंवा नंदीबैलांची पुजा केली जाते. त्यामुळे ठिकठिकाणी लाकडांचे नंदीबैलही विक्रीसाठी आले आहेत. यात तब्बल साडेपाच फुटांचा लाकडी नंदीबैल आकर्षणाचे केंद्र झाला आहे.
आंब्याच्या लाकडापासून बनविलेल्या या नंदीबैलाची किंमत तब्बल ४० हजार रुपये असल्याचे विक्रेता राहुल कोसरे यांनी सांगितले. याशिवाय शेअर मार्केटचे प्रतीक असलेला उधळलेला लाकडी बैल, म्हणजे ‘बिग बूल’ सुद्धा विक्रीसाठी आणण्यात आला आहे. एवढे मोठे आणि मोठ्या किमतीचे हे नंदीबैल विकत घेणे परवडणारे नसले तरी या बैलांना न्याहाळून आपल्या मोबाईलमध्ये त्याची झलक टिपण्यासाठी पोलिस स्टेशनसमोरील चंद्रपूर मार्गावर गडचिरोलीकर गर्दी करत आहेत.