कार्यकर्ते हिच माझी खरी संपत्ती, त्यांच्या सहवासातूनच मिळते उर्जा

जाहीर सत्कारावर अरविंद सा.पोरेड्डीवार यांची भावना

गडचिरोली : या जिल्ह्यातील प्रत्येक गरीब माणूस स्वत:च्या पायावर उभा राहील तोच माझ्यासाठी मोठा दिवस असेल. मी आज ६९ वर्षाचा झालो असलो तरी मी रिटायर्ड झालेलो नाही. माझी वाटचाल अशीच सुरू राहील, असे सांगत जिल्हाभरातील माझे कार्यकर्ते हीच माझी संपत्ती आहे. त्यांच्या सहवासातून मला नवी उर्जा मिळते. त्यांचा सहवास असाच कायम मिळत राहावा, अशी भावना ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन मुंबईतर्फे दिल्या जाणाऱ्या सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या कै.विष्णू अण्णा पाटील जीवन गौरव पुरस्काराने अरविंद सावकार पोरेड्डीवार यांना नाशिक येथे गौरविण्यात आले. त्यानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर आणि कार्यकर्त्यांच्या वतीने मंगळवारी (दि.१२) त्यांचा गडचिरोलीत अभिननंदन सोहळा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते तर अतिथी म्हणून आ.डॅा.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, प्रचारक तथा माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा संपर्क प्रमुख हेमंत जंबेवार, प्रकाश गेडाम, गडचिरोली बाजार समितीचे सभापती शशिकांत साळवे, आरमोरी बाजार समितीचे सभापती पासेवार, आरमोरीचे नगराध्यक्ष पवन नारनवरे, माधव निरंकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि कोरची ते सिरोंचापर्यंत सहकार आणि इतर क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ, पुष्पहार आणि शाल पांघरून सत्कार करण्यात आला. याशिवाय विविध संस्था, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार आणि अभिनंदन करण्यासाठी एकच गर्दी केली होती. सत्काराला उत्तर देताना पोरेड्डीवार यांनी मोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त केल्या. आजकाल व्हाट्स अपच्या जमान्यात माणूस माणसापासून दुरावल्या जात आहे. कुटुंब कुटुंबापासून दूर जात आहे अशी खंत व्यक्त करत, आज राजकारणाची दिशा बदलली असून अस्थिरता वाढली आहे, मात्र पोरेड्डीवार परिवाराशी जुळलेले कार्यकर्ते तीन पिढ्यांपासून कायम आहेत, त्यांचे प्रेम सातत्याने मिळत आहे, असे त्यांनी अभिमानाने सांगितले.

अध्यक्षीय भाषणात खा.अशोक नेते यांनी अरविंद सावकारांच्या सहवासात आल्यानंतर त्यांच्यातील अनेक गुणांचा परिचय झाला. अनेक लोकांचे आयुष्य त्यांनी उभे केले. असेच काम त्यांच्याकडून होत राहो, अशा शुभेच्छा दिल्या. आ.डॅा.देवराव होळी आणि आ.कृष्णा गजबे यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना त्यांच्यामुळे आपल्या आयुष्याला नवीन आकार मिळाल्याची भावना व्यक्त केली. प्रशांत वाघरे यांनी सावकार हे हृदयांकित वलय असणारे व्यक्तिमत्व असल्याचे असून त्यांच्या कुटुंबात लक्ष्मीसोबत सरस्वतीही वास करत असल्याचा उल्लेख केला. किशन नागदेवे यांनी सावकारांबद्दल भावना व्यक्त करताना त्यांनी सहकार क्षेत्राला शिस्त लावली. आमदार घडवले, पण अहंकाराचा लवलेश त्यांच्यात नाही. इतर जिल्हा बँकांना भ्रष्टाचाराची की़ड लागली असताना गडचिरोली जिल्हा बँकेकडे कोणी बोट दाखवू शकले नसल्याचे म्हटले.

प्रास्ताविकात जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी हा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार पहिल्यांदा विदर्भातील व्यक्तीला मिळाल्याचे सांगत हा अरविंद सावकारांना साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार असल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे बहारदार संचालन प्रा.डॅा.नरेंद्र आरेकर यांनी तर आभार प्रदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी केले.

इंदिरा गांधी चौकात अभूतपूर्व स्वागत, आतिषबाजी आणि भल्यामोठ्या पुष्पहाराने वेधले लक्ष 

अरविंद सावकार पोरेड्डीवार यांचे गडचिरोलीत आगमन होताच इंदिरा गांधी चौकात मोठ्या संख्येने जमलेल्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि चाहत्यांनी एकच जल्लोष केला. खासदार अशोक नेते, आमदार डॅा.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे यांनीही पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी आतिषकबाजी आणि भल्यामोठ्या हाराने आणि जेसीबीच्या सहाय्याने फुलांच्या पाकळ्या उधळत कार्यकर्त्यांनी स्वागत केले. ‘अरविंद सावकार आगे बढो, हम तुमारे साथ है’ असा जयघोष करत ढोलताशाच्या गजरात त्यांची रॅलीही निघाली. दरम्यान चौकाजवळ उभारलेल्या शामियान्यात त्यांचा छोटेखानी स्वागत सोहळा झाला. यावेळी गुलाबपुष्प देऊन त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.