गडचिरोली : भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील एका युवकाचा चामोर्शीजवळ, तर कोरची तालुक्यातील शिकारीटोला येथील युवकाचा सोहले गावाजवळ ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. रविवारी हे दोन्ही अपघात घडले.
भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील मुकेश बोगामी यांचे नातेवाईक गडचिरोली जिल्हा रुग्णालयात भरती असल्याने रविवारी मुकेश दुचाकीने गडचिरोलीला आले होते. त्यांच्या नातेवाईकांची भेट देऊन परत मुकेश लाहेरीला जात असताना चामोर्शीजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटून ते खाली पडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
गडचिरोलीत मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह लाहेरीला घेऊन जाण्यासाठी बोगामी कुटुंबियांना आर्थिक अडचण होती. माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार हे भामरागड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांना कार्यकर्त्यांनी ही अडचण सांगितली. कंकडालवार यांनी गडचिरोली येथील कार्यकर्त्यांना सांगून मृतदेह आणण्यासाठी गाडी उपलब्ध करून दिली.
दुसऱ्या अपघातात शिकारीटोला येथील महेश रामसाय कोवाची (२३ वर्ष) हा युवक कोरचीवरून कॅाम्प्युटर क्लास आटोपून गावाकडे दुचाकीने निघाला असताना समोरून येणाऱ्या ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत तो रस्त्यालगतच्या शेतात फेकल्या जाऊन त्याचा मृत्यू झाला. कोरची पोलिसांनी दोन्ही वाहन ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.