चामोर्शी : वाढदिवसाचा जल्लोष करण्याऐवजी तो समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्याची गेल्या 40 वर्षापासूनची परंपरा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शीचे सभापती अतुल गण्यारपवार यांनी यावर्षीही कायम ठेवली. रक्तदान शिबिरात 63 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ या भावनेला प्रत्यक्ष कृतीची जोड दिली.
वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि.8 सप्टेंबर) भेंडाळा येथील किसान भवनात रक्तदान व मोफत ईसीजी तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या सामाजिक उपक्रमाला परिसरातील युवक, नागरिक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वाढदिवसाच्या केवळ औपचारिक शुभेच्छा किंवा खर्चिक कार्यक्रम न करता गेल्या 40 वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श अतुल गण्यारपवार यांनी निर्माण केला आहे. त्यांच्या पुढाकारातून दरवर्षी 500 हून अधिक रक्तदात्यांचे रक्तदान, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक व जीवनावश्यक साहित्याचे मोफत वितरण, हजारो नागरिकांसाठी भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे, मोफत चष्म्यांचे वितरण तसेच गरीब व गरजू रुग्णांना नागपूरसारख्या शहरात डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी मदत केली जाते.
यासोबतच अनेक गावांमध्ये फळझाडे व औषधी वनस्पतींच्या रोपांचे मोफत वितरण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला जात आहे. त्यामुळे वाढदिवस हा स्वतःच्या आनंदापुरता मर्यादित न ठेवता समाजासाठी उपयोगी आणण्याची त्यांची कार्यपद्धती परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.
‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’
अपघातग्रस्त, प्रसुतीतील महिला, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण तसेच विविध गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत एका रक्तदात्याचे रक्त अनेक रुग्णांसाठी आशेचा किरण ठरू शकते. त्यामुळे रक्तदान हा केवळ सामाजिक उपक्रम नसून प्रत्यक्ष जीवनदान देणारी मानवतावादी सेवा आहे, हा संदेश या शिबिरातून देण्यात आला. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला आयोजकांच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. रक्तदानासोबतच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत मोफत ईसीजी (ECG) तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हृदयविकाराचा वाढता धोका लक्षात घेता नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात आले.
या सामाजिक उपक्रमासाठी गण्यारपवार फाऊंडेशन चामोर्शी, त्यागमूर्ती सोनिया गांधी माध्यमिक विद्यालय, मोहाळी (मो.), भारतरत्न राजीव गांधी माध्यमिक विद्यालय मुरखळा माल, तसेच भेंडाळा व परिसरातील ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमोल गण्यारपवार व संस्था अध्यक्ष अजिंक्य गण्यारपवार यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हा चिटणीस नरेंद्र जुवारे, भेंडाळा ग्रामपंचायतच्या सरपंच कुंदा जुवारे, फोकुर्डीच्या सरपंच रुपाली दहेलकर, सामाजिक कार्यकर्ते भगिन्द्र झाडे, नामदेव पाटील किनेकर, शामराव पाटील पोरटे, गुरुदास पाटील चुधरी यांच्या नेतृत्वात इसीजी तंत्रज्ञ् डॉ.शुभम कोसमशिले, भेंडाळा प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम डुंपेट्टीवार, रक्त संकलन तंत्रज्ञ् मनीषा मेश्राम, समचिराण चिडके या वैद्यकीय तज्ञांसोबतच, प्रमोद गोरलावार, प्राचार्य जे.विलास, हरीश गेडाम, शिवाजी मंडळ भेंडाळा, संदीप रुमाजी आभारे, सोमेश्वर पाट्टेवार रामाळा, अनिल आभारे, उत्साही गणेश मंडळ भेंडाळा, वीर शिवाजी मंडळ घारगाव, सुनील आभारे, लोभेश गोरलावार, संदीप बट्टे, चेतन गोरलावार, श्रावण मेश्राम, पुरुषोत्तम चापले, सुशील बंडावार, मंगेश हुमणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, स्थानिक कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
































