गडचिरोली : आपल्या मालकीच्या प्लॅाटवर नगर परिषदेकडून कोणतीही रितसर परवानगी न घेता अनधिकृतपणे पक्के बांधकाम केल्याप्रकरणी गडचिरोली नगर परिषदेच्या नगरसेविका शिल्पा अंकित हेमके यांच्यावर तातडीने अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने केली आहे.
नगरसेविका शिल्पा हेमके (गव्हारे) यांच्यासह त्यांच्या इतर भागीदारांनी सर्व्हे क्रमांक 11/1 क या खुल्या जागेवर रहिवासी वापराकरिता अकृषक प्लॅाट काढून प्लॅाटची विक्री सुरू केली आहे. वास्तविक ले-आऊट पाडून प्लॅाट विक्री करताना भूमीगत नाली, रस्ते, विद्युत पथदिवे, खुल्या जागेवर सौंदर्यीकरण अशा काही बाबी अनिवार्य आहेत. मात्र त्याचे पालन झालेले नाही, असा आरोप बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे यांनी केला आहे. याशिवाय सर्व्हे क्रमांक 11/1, भूखंड क्रमांक 66 हा नगर परिषदेकडे गहाण असताना त्या भूखंडावर पक्क्या स्वरूपात अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा आरोप बांबोळे यांनी केला आहे.
याप्रकरणी हेमके यांच्याविरूद्ध आधीच कागदपत्रांच्या पुराव्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार झाली होती. त्याअनुषंगाने नगर पालिका प्रशासनाच्या जिल्हा सहआयुक्तांनी गडचिरोली न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. नगरसेविका हेमके यांचे हे कृत्य महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती आणि औद्योगिक टाउनशिप अधिनियम, 1965 च्या कलम 44 मधील तरतुदीचे थेट उल्लंघन करणारे असल्याचा ठपका जिल्हा सहआयुक्तांनी ठेवला आहे. त्यामुळे हेमके यांना नगरसेवकपदावरून अपात्र करावे, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
कारवाई करण्याचे अधिकार आम्हाला नाही
नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीत येतात. तो आमचा अधिकार नाही, असे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी स्पष्ट केले. मात्र नगर परिषदेकडे गहाण ठेवलेल्या भूखंडावर पक्के बांधकाम करणे हा गुन्हा असल्यामुळे याप्रकरणी कायदेशिर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
कारवाईच्या आदेशावर स्थगनादेश?
याप्रकरणी नगरसेविका शिल्पा अंकित हेमके यांना प्रतिक्रिया विचारली असता लेआऊटमधील ते बांधकाम चौकीदारासाठी तात्पुरत्या स्वरूपात आणि सामान ठेवण्यासाठी केले असल्याचे त्या म्हणाल्या. शिवाय याप्रकरणात कारवाईच्या आदेशाला आम्ही स्थगनादेश मिळवला असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे या घटनाक्रमाबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
































