टसर रेशीम शेतीमध्ये ग्रामीण रोजगार निर्माण करण्याची क्षमता- डॅा.चौधरी

आरमोरीत टसर रेशीम कृषी मेळावा

आरमोरी : रेशीम उद्योग नागरिकांना आर्थिक उत्पन्नासाठी फायदेशीर असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळण्याचे आवाहन रांची येथील केंद्रीय रेशम बोर्ड, केन्द्रीय टसर अनुसंधान व प्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉ.एन.बी.चौधरी यांनी बुधवारी केले.

टसर उद्योगाला गती प्रदान करण्यासाठी केंद्रीय रेशीम बोर्ड-केंद्रीय टसर अनुसंधान व प्रशिक्षण संस्थान रांची आणि महाराष्ट्र राज्य रेशम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आरमोरी येथे टसर रेशम कृषि मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.चौधरी मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमाला रेशीम विभागाचे उपसंचालक डॉ.महेंद्र धावले, सहायक संचालक हेमंत लाडगांवकर, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे, जिल्हा रेशीम अधिकारी सी.आर.वासनिक प्रामुख्याने उपस्थित होते.

आगामी वर्षांत टसर रेशीम शेतीला प्रोत्साहन देणे आणि रेशीम उत्पादनक्षमता वाढवणे हे संशोधन आणि विकासाचे मुख्य लक्ष्य असून टसर रेशीमला त्याच्या चमकदार आणि अद्वितीय गुणवत्तेसह लोकप्रिय बनवणे आवश्यक असल्याचे डॉ.चौधरी यावेळी म्हणाले.

निसर्गाने पानांपासून रेशम तयार करण्याची अद्भुत कला टसर रेशम किटकाला प्रदान केली आहे. टसर रेशीम आपल्या समृद्ध बनावट आणि नैसर्गिक, गडद सोनेरी रंगासाठी मौल्यवान आहे. रेशीम उद्योग नागरिकांना आर्थिक उत्पन्नासाठी फायदेशीर असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळण्याचे आवाहन डॉ.चौधरी यांनी केले

कार्यक्रमाचे संचालन सी.आर.वासनिक यांनी केले, तर आभार प्रदर्शन अनिलकुमार ढोले यांनी केले. या मेळाव्याला कृषि अधिकारी नीलेश गेडाम, रेशीम कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी तसेच रेशीम उत्पादक शेतकरी व नागरिक उपस्थित होते.