गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठांतर्गत इंदिरा गांधी महाविद्यालयातर्फे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या हस्ते झाले. गडचिरोली तालुक्यातील विश्रामपूर मेंढा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आयोजित या शिबिरात त्यांनी आजचे युवक हे उद्याचे राष्ट्रनिर्माते आहेत. त्यामुळे त्यांचे जीवन नशामुक्त आणि अहिंसायुक्त असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
13 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या शिबिराचा विषय ‘नशामुक्त युवा- अहिंसायुक्त युवा : ग्राम विकास ते राष्ट्र विकास’ असा आहे. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे यावेळी अशोक नेते म्हणाले. त्यांनी युवकांना नशामुक्त जीवन जगण्याचे महत्त्व समजावताना, शिक्षण हीच प्रगतीची गुरुकिल्ली असल्याचे सांगून शैक्षणिक आणि सामाजिक जीवनात वावरताना नशेपासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
सामाजिक प्रबोधनातून सकारात्मक संदेश
या शिबिरात विद्यार्थ्यांनी एक प्रभावी नाटिका सादर केली, जी सामाजिक प्रबोधनासाठी प्रेरणादायी ठरली. मोबाईलचा दुष्परिणाम आणि त्याचा लहान मुलांवर होणारा नकारात्मक प्रभाव याचे सुंदर चित्रण त्यात करण्यात आले. या नाटिकेने उपस्थितांमध्ये जागृती निर्माण केली. नाटकाचे कौतुक करताना उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
या शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विश्व शांतिदूत प्रकाश अर्जुनवार, उद्योजक रमेश सारडा, सरपंच वैशाली चचाने, वैद्यकीय अधिकारी डॉ.कोरेवार, कुणाल निंबोडकर, संजय बारापात्रे, जीवन दाणे, प्रमोद साखरे, अशोक अंबादे, मधुकर भोयर आदी मान्यवर उपस्थित होते. गावातील नागरिक, युवक, विद्यार्थीवर्गाने या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावली.