सिरोंचा : गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातल्या कोटापल्ली येथील पोचमा देवी मंदिर परिसरात गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षी बोनालू उत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी 7 आणि 8 एप्रिल रोजी हा उत्सव झाला. याला महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील हजारो भाविकांनी हजेरी लावली. खिरीने भरलेले मातीचे मडके डोक्यावर घेऊन महिला मंदिराच्या सभोवताल तीन प्रदक्षिणा घालून देवीला प्रसाद अर्पण करतात. या उत्सवानिमित्त मंदिर परिसरात रात्री 9 वाजतापासून सकाळी 7 वाजेपर्यंत देवीचे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
कोटापल्ली येथे मदनाम पोचमा देवी मंदिर परिसरात या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. भाविकांच्या गर्दीने मदनाम पोचमा देवी मंदिराचा परिसर फुलून गेला होता. उत्सावादरम्यान विविध प्रकारची दुकाने लागली होती. भाविक आपली मनोकामना पूर्ण व्हावी, यासाठी देवीला साकडे घालीत होते.
काय असते बोनालू?
बोनालू म्हणजे एका कलशात प्रसादरूपी खिर शिजविली जाते. शिजलेली खिर सजविलेल्या मडक्यात ठेवली जाते. नंतर ते मडके डोक्यावर घेऊन महिला भाविक मंदिराच्या सभोवताल तीन प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर देवीला प्रसाद अर्पण करुन उपस्थित भाविकांनाही प्रसाद वाटला जातो. मदनाम पोचमा देवी जत्रा ही तालुक्यातील सर्वात मोठी जत्रा आहे. सदर जत्रा भाविक व नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली आहे.
आलेल्या भाविकांना व नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मंदिर कमिटीकडून भाविकांसाठी दोन दिवसांची राहण्याची, जेवणाची सुविधा करण्यात आली होती.