एटापल्ली : आतापर्यंत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून काहीसे अलिप्त राहिलेले माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी अखेर महलाबाहेर पडत प्रचारासाठी एटापल्ली गाठले. राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गुंडाम गावातील महायुतीच्या प्रचारसभेत त्यांनी हजेरी लावून मार्गदर्शन केले.
महायुतीतचे उमेदवार अशोक नेते यांने नामांकन भरण्याच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभेला अम्ब्रिशराव उपस्थित होते. पण त्यानंतर ते प्रचारात सहभागी झाले नव्हते. दरम्यान पक्षाचे नेते डॅा.रामदास आंबटकर यांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी प्रचाराला सुरूवात केली.
प्रचारसभेत बोलताना अम्ब्रिशराव म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे लोटूनही आपल्या भागात शेकडो गावात वीज पोहोचली नव्हती. रस्ते व पुलांच्या अभावामुळे अतिशय कठीण परिस्थीतीत जगावे लागत होते. मात्र आज गुंडामसारख्या अत्यंत दुर्गम भागापर्यंत रस्ते व वीज पोहोचलेली आहे. पूर्वी छोट्या-छोट्या वस्तुंसाठी थेट तालुक्याला जावे लागायचे. परंतु आज रस्ते बनल्यामुळे खेडोपाडी आठवडी बाजार भरत आहे. शासनच नव्हे तर जग सुध्दा तुमच्या दारात येऊन पोहोचलेले आहे. याचे श्रेय केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजप सरकारला जाते. दुर्गम भागातील आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम फक्त भाजपानेच केले आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी मंचावर प्रशांत आत्राम, प्रशांत कुत्तरमारे, रवी नेलकुद्री, मोहन नामेवार, दामोदर नरोटे, सुनील मडावी, बंडू इष्टाम, योगेश कुमरे, राजू लेनगुरे, शुभ मुरलीवार, सम्मा जेट्टी, दीपक पांडे आदी उपस्थित होते.