गडचिरोली : केंद्र शासनाच्या 2017 च्या ध्वनी प्रदूषणाच्या सुधारित नियमानुसार रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात लाऊडस्पिकर सुरू ठेवता येत नाही. पण सण, उत्सवाच्या दिवसात वर्षातील 15 दिवस या नियमात शिथिलता देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 13 दिवस लाऊडस्पिकरचा वापर रात्री 10 एेवजी 12 वाजेपर्यंत करण्यास सूट देण्याचे निश्चित केले आहे.
जिल्हाधिकारी यांनी संबंधित ध्वनी प्राधिकरण तथा पोलिस अधीक्षक यांच्याशी सल्लामसलत करुन ते 13 दिवस कोणते राहतील हे निश्चित करून ते नागरिकांच्या माहितीसाठी ते जाहीर केले आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती- 1 दिवस (19 फेब्रुवारी 2024), डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती- 1 दिवस (14 एप्रिल), महाराष्ट्र दिन – 1 दिवस (1 मे), गणपती उत्सव – 3 दिवस (पाचवा, सातवा व अनंत चतुर्दशी), ईद-ए-मिलाद- 1 दिवस (16 सप्टेंबर), नवरात्री उत्सव / विजयादशमी – 3 दिवस (दि.11, 12 व 13 ऑक्टोबर), दिवाळी- 1 दिवस (लक्ष्मीपूजन 1 नोव्हेंबर) ख्रिसमस – 1 दिवस (25 डिसेंबर 2024) आणि थर्टी फर्स्ट- 1 दिवस (31 डिसेंबर 2024).
जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केल्यानुसार वरील 13 दिवस श्रोतृगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकांचा वापर करता अटी व शर्तीच्या अधिन राहून करता येणार आहे. ही सुट राज्य शासनामार्फत घोषित शांतता क्षेत्रात लागू नाही, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.